मुंबईतील उद्यानांना आता राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान यांची नावे

बाजार व उद्यान समिती व महापालिकेच्या मान्यतेनंतर हे नामकरण केले जाणार आहे.

ब्रिटीशांशी निकराने झुंजणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांच्या आठवणी आजही चिरंतन असून, भावी पिढीच्या समोरही त्या चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न आहे. दीडशे-दोनशे वर्षांनंतर त्यांची आठवण पुन्हा काढली जात आहे. मुंबईतील मालाड बावडी लेनमधील उद्यानाला राणी लक्ष्मीबाई तर देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळील गोवंडीतील उद्यानाचे टिपू सुलतान उद्यान, असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची मागणी

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिध्दीकी यांनी गोवंडीतील प्रभाग १३६ मधील साहीनाका डम्पिंग ग्राऊंड येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्याचा प्रस्ताव, जानेवारी २०२१ला बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मांडला होता. टिपू सुलतान हे भारताचे क्रांतीसेनानी होते. दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रांताचे ते राजे होते. योग्य शासक, महान योध्दा व विद्वत्ता असे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यांनी त्यांच्या काळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात युध्द पुकारले. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्याचा त्यांनी पहिला प्रयत्न केला होता. त्यांच्या या महान कार्याबद्दलची माहिती चिरंतन राहावी, म्हणून या उद्यानाला टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्याची इच्छा सिध्दीकी यांनी केली होती. या नामकरणाला प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाला असून, बाजार व उद्यान समिती व महापालिकेच्या मान्यतेनंतर हे नामकरण केले जाणार आहे.

(हेही वाचाः मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!)

महापालिकेच्या मान्यतेनंतर होणार नामकरण

मालाड पश्चिममधील प्रभाग ४६ मध्ये बावडी लेन येथील एक आरक्षित भूखंड महापालिकेला नव्याने हस्तांतरित झाला आहे. या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेविका जया सतनाम तिवाना यांनी फेब्रुवारी महिन्यात मांडला होता. इ.स.१८५७चा उठाव झाल्यानंतर झाशी संस्थान ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी फौजेला धीर देताना स्वत:च्या बळावर लढण्याचे आवाहन केले. ब्रिटीशांशी निकराची झुंज देतानाच वयाच्या २३ वर्षी त्यांना वीरमरण आले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर सदैव राहावा म्हणून मालाडमधील आरक्षित उद्यानाला त्यांचे नाव देण्याची मागणी जया तिवाना यांनी केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला असून, बाजार व उद्यान समितीसह महापालिकेच्या मान्यतेनंतर याचे नामकरण केले जाणार आहे.

(हेही वाचाः मुंबई कोस्टल रोड प्रकल्प: भारतात प्रथमच एक स्तंभी पायावर उभारणार समुद्रातील पूल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here