मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त

मुंबईतील एकूण ९ विभागांत हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दर्जा पुन्हा खालावत चालला आहे. मागील दोन वर्षांमध्ये दूषित पाण्याच्या समस्येचे प्रमाण कमी होत असताना, कोविड काळातच दूषित पाण्याच्या प्रमाणात ०.२ ने वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण हे ०.७ टक्के एवढे होते. परंतु मागील वर्षी हे प्रमाणे ०.९ टक्के एवढे झाले आहे. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण परत वाढल्याने, मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर पुन्हा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. मात्र दहिसर भागात दूषित पाण्याची समस्या नसून, या भागात आजही शुद्ध पाणी मिळत असल्याचे अहवालावरुन दिसून येत आहे.

नियोजन फसले

मुंबईला दरदिवशी ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असून, काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मागील पाच ते सात वर्षांपूर्वी अधिक असलेल्या दूषित पाण्याच्या समस्येचे प्रमाण कमी होऊन ०.७ टक्क्यांवर आले होते. पण हे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने, कुठेतरी जलअभियंता विभागाचे नियोजन फसत असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचाः शिवाजी पार्कची रोषणाई मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून की महापालिका निधीतून?)

या भागांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी

कोविड काळात(एप्रिल २०२० ते मार्च २०२१) मुंबईतील दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील एकूण ९ विभागांत हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या कालावधीमध्ये पाण्याची गळती व त्यांच्या दुरुस्तीचे प्रमाण कमी झाल्यानेच ही समस्या पुन्हा उद्भवल्याचे पहायला मिळत आहे. ज्या भागांमध्ये दूषित पाण्याची समस्या वाढलेली आहे, त्यामध्ये मुलुंड प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर भांडुप ते विक्रोळीचा परिसर, वडाळा अँटॉप हिल, धारावी, माहिम-दादर, गोरेगाव आदींचा समावेश आहे.

अशी होते चाचणी

पिण्याच्या पाण्याचे अणू-जीवशास्त्रीय विश्लेषण भारतीय मानक यानुसार करण्यात येत आहे. जलवितरण प्रणालीतील पिण्याचे पाणी कोलिफोर्म आणि ई-कोलाय या जीवाणूंपासून मुक्त असले पाहिजे. महापालिकेच्या प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्यामधील कोलिफोर्म आणि ई-कोलाय हे प्रामुख्याने तपासले.

(हेही वाचाः आता मुंबई दिसणार थ्रीडी…)

२९ हजार नमुन्यांची चाचणी

२०२०-२१ मध्ये पाण्याचे एकूण २९ हजार ५१ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी दूषित पाण्याचे २७५ नमुने आढळले. दूषित पाण्याची टक्केवारी ०.९ टक्के एवढी खाली आणण्यात महापालिकेला यश आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु सन २०१८-१९ व २०१९-२० या दोन्ही वर्षी ०.७ टक्के एवढेच दूषित पाण्याचे प्रमाण होते. त्यामुळे मागील दोन वर्षांतील आकडेवारी पाहता दूषित पाण्याचे प्रमाण पाहता हे वाढल्याचेही पहायला मिळत आहे.

हे परिसर दूषित पाणीमुक्त

महापालिकेच्या ‘आर उत्तर’ अर्थात दहिसर आणि वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागात एकही दूषित पाण्याची समस्या आढळली नाही. दहिसर भाग हा दूषित पाणीमुक्त असा परिसर बनलेला आहे. विशेष म्हणजे दाटीवाटीने वसलेल्या चेंबूर भागातही दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय दूषित पाण्याची सर्वाधिक समस्या असलेल्या गिरगाव, मरिन लाईन्स या ‘सी’ विभागात हे प्रमाण कमी होऊन १.३ टक्क्यांवरुन ०.२ टक्क्यांवर आले आहे.

(हेही वाचाः सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्याची वाटचाल डांबरीकरणाच्या दिशेने! या भागातील रस्त्याचे गूढ उकलले)

दूषित पाण्याचे ९ विभाग

  1. भायखळा (ई विभाग) : १.१ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.८ व ०.१ टक्के)
  2. शीव,वडाळा, अँटॉप हिल (एफ उत्तर विभाग) : २.२ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे १.२ व ०.१ टक्के)
  3. परळ, शिवडी, लालबाग (एफ दक्षिण विभाग) : १.८ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.८ व १.२टक्के)
  4. दादर, माहिम, धारावी (जी उत्तर विभाग): ३.४ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.९ व १.५ टक्के)
  5. घाटकोपर (एन विभाग) : १ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.७ व ०.३ टक्के)
  6. मालाड (पी उत्तर विभाग) : ०.४ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.२ व ०.२ टक्के)
  7. गोरेगाव (पी दक्षिण विभाग) :२.४ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.८ व १.३ टक्के )
  8. भांडुप ते विक्रोळी (एस विभाग) : १ टक्का (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.१ व ०.६टक्के)
  9. मुलुंड (टी विभाग) : २.३ टक्के (मागील दोन वर्षांत अनुक्रमे ०.४ व ०.२ टक्के)

(हेही वाचाः या दोन सहायक आयुक्तांच्या नावासमोर लागणार उपायुक्तपदाची पाटी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here