घाबरू नका! पोलिस आता तुमच्याकडून ‘शपथपत्र’ घेणार नाही!

हरवलेल्या कागदपत्रासाठी पोलिस प्रमाणपत्र घेताना कुठलेही शपथपत्र लागत नसतांना पोलिस ठाण्याकडून उगाच त्याची मागणी केली जाते, हे बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त यांनी म्हटले आहे.

‘साहेब, माझा पासपोर्ट गहाळ झाला आहे! जा अगोदर अफिडेव्हिड (शपथपत्र) घेऊन ये’, हे वाक्य पोलिस ठाण्यात हरवलेल्या कागदपत्राची तक्रार करण्यासाठी गेलेल्यांना हमखास ऐकायला मिळते. पण आता हे वाक्य ऐकायला मिळणार  नाही. कारण पोलिस आयुक्त साहेबांनी तसा हुकूमच काढला आहे. जो पोलिस अधिकारी तुमच्याकडे शपथपत्र मागेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा लेखी स्वरूपाचा आदेश मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढला आहे. यापुढे सामन्यांना हरवलेल्या कागदपत्रासाठी कुठल्याही प्रकारचे शपथपत्र पोलिस ठाण्यात सादर न करताच पोलिस तुमच्या हातात पोलिस प्रमाणपत्र देतील.

(हेही वाचा : तो दिवसा कपडे विकायचा, रात्री मात्र करायचा ‘हे’ कृत्य!)

…तर अधिकाऱ्यांची खातेनिहाय कारवाई होणार 

कधी प्रवासात, तर घरातून महत्वाचे कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे कागदपत्राची नक्कल प्रत तयार करण्यासाठी सरकारी कार्यालय असो अथवा खाजगी यंत्रणा असो, तुमच्याकडे पोलिस प्रमाणपत्र मागितले जाते. मात्र पोलिस प्रमाणपत्र घेण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणाऱ्या व्यक्तीकडून पोलिस प्रथम शपथपत्र (अफिडेव्हिड) आणण्यास सांगतात. हे नोटरी केलेले शपथपत्र आणायचे म्हणजे वकील आलेच ! मग त्यासाठी ३०० ते ४०० रुपये खर्च करावे लागतात, त्यात वेळही भरपूर जातो. मात्र हरवलेल्या कागदपत्रासाठी पोलिस प्रमाणपत्र घेताना कुठलेही शपथपत्र लागत नसतांना पोलिस ठाण्याकडून उगाच त्याची मागणी केली जाते, हे बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त यांनी म्हटले आहे. गहाळ झालेल्या वस्तू अथवा कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही, तरीही पोलिसांकडून अशा शपथपत्राची मागणी करून तक्रारदाराची अडवणूक केली जात असल्याचे आयुक्तांच्या परिपत्रकात म्हटले असून यापुढे याप्रकारे अडवणूक करणाऱ्या अधिकारी यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त नगराळे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here