मुंबईच्या पश्चिम उपनगराच्या शेवटला असलेल्या दहिसरमधील काही भागांमध्ये दहिसर नदी आणि भाईंदर खाडीला जोडल्या जाणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून दहिसरकरांची असलेली ही समस्या आता कायमचीच निकालात निघणार असून, भाईंदर खाडीला जोडल्या जाणाऱ्या नाल्याच्या आणि दहिसर नदीच्या उत्सर्ग बिंदूच्या ठिकाणीच संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. त्यामुळे पश्चिमेला हिरानंदानी परिसरात आणि पूर्वेला एन.एल. संकुलात तुंबणा-या पाण्याची समस्या मिटणार आहे.
(हेही वाचाः अमृता म्हणते, आगीशी खेळू नका)
निर्माण होते पूरपरिस्थिती
दहिसर पश्चिम येथील हिरानंदानी परिसरातून दहिसर नदी वाहत जात असून, या हिरानंदानी परिसर सखल भागात पावसाळ्यादरम्यान पाणी साचून पूरसदृष्य स्थिती निर्माण होते. पावसाच्या या पाण्यामुळे दहिसर नदीच्या उत्सर्ग बिंदूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ व तरंगणारा कचरा साचल्याने येथील पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नसल्याचे आढळून आले. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण होते.
लवकरच कामाला सुरुवात
त्यामुळे हिंरानंदानी पुलाच्या जवळ दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येत असून, यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ७.१० कोटी रुपये खर्च करून याठिकाणी भिंत उभारली जाणार असून, या कामासाठी ए.एस.के कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र, या भिंतीच्या कामाला महाराष्ट्र सीआरझेडची परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सीआरझेडची परवानगी मिळाल्यानंतर या भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
(हेही वाचाः शिवसेनेच्या चुकीमुळेच सहा वर्षांपासून ४ लाख कुटुंबे हक्काच्या पाण्यापासून राहिली वंचित)
बारा महिन्यात पूर्ण होणार काम
तर दहिसर पूर्व येथील एन.एल.संकुल परिसरातून नाला जात आहे. हा नाला भाईंदर खाडीला जावून मिळतो. या नाल्याच्या उत्सर्ग बिंदूच्या ठिकाणी गाळ तसेच तरंगणारा कचरा साचल्याने याठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी १४.७१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी डि.बी.इन्फ्राटेक या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही संरक्षक भिंतीचे बांधकाम हे पावसाळा वगळून बारा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community