गांधी मार्केट येथील तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला! ‘हा’ प्रयोग झाला यशस्वी

मिनी पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर गांधी मार्केट येथे पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाणी समस्येला पूर्णविराम लागला आहे.

मुंबईत हिंदमाता परिसरानंतर पूरपरिस्थिती निर्माण होणारा दुसरा परिसर म्हणजे माटुंगा-शीव येथील गांधी मार्केट. मुसळधार पावसात १५ ते २० मिमी. पाऊस पडला तरी हा परिसर पाण्याखाली जाऊन येथील सर्व वाहतूक सेवा अन्य मार्गाने वळवावी लागते. येथील चार लेनपैकी बाजूच्या लेन पूर्णपणे बंद करण्याची वेळ येते. परंतु सोमवारी ३५ मिमी. पावसाची नोंद होऊनही या परिसरात पाण्याचा एक थेंब साचलेला दिसून आला नाही. तसेच यामुळे वाहतूकही वळवण्याची वेळ आली नाही. ही किमया साध्य झाली आहे ती म्हणजे याठिकाणी उभारण्यात आलेल्या लघू उदंचन केंद्रा(मिनी पंपिंग स्टेशन)मुळे. हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर सोमवारी प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पण तरीही पाणी साचले नसल्याने, माटुंगाकरांसहित सर्व मुंबईकरांसाठी ही आनंदाची आणि समाधानाची बाब मानली जात आहे.

भाजप नगरसेविकेची मागणी

माटुंगा-शीव येथील गांधी मार्केट परिसरात सातत्याने कमी पावसातही पाणी तुंबले जात होते. त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवून, तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करत याठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाय शोधला जावा, अशी मागणी केली होती.

(हेही वाचाः आता ऑलिम्पिकसाठी जाणा-या खेळाडूंना मुंबईत अशी मिळणार लस)

अभ्यास अहवालानंतर निर्णय

मागील वर्षी वांद्रे कलानगर परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय म्हणून मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले होते. त्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मागील वर्षीच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांसह एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांना याठिकाणी पाणी न तुंबण्याबाबत अभ्यास करुन अहवाल द्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अभ्यास अहवालानंतर पर्जन्य जलवाहिनी विभाग व एफ-उत्तर विभागाने याठिकाणी असलेल्या ३४०० अश्वशक्ती पंपांच्या तुलनेत येथे १२००० अश्वशक्तींचे पंप बसवून मिनी पंपिंग स्टेशन तयार करण्याचा निर्णय घेतला.

प्रयोग यशस्वी

या पंपिंग स्टेशनचे काम मागील आठवड्यात पूर्ण झाले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मिनी पंपिंग स्टेशनचा पहिला यशस्वी प्रयोग सोमवारी पार पडला. हे पंप राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते चालू केल्यानंतर याठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी न तुंबल्याने गांधी मार्केटमधील दुकानदार आणि या परिसरातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, मार्केटमधील दुकानदार व रहिवाशी उपस्थित होते.

(हेही वाचाः आता मुंबईच्या मार्केटमधील विक्रेते होणार लसवंत! काय आहे महापालिकेचा निर्णय?)

पाणी तुंबण्याच्या समस्येला पूर्णविराम

एरव्ही १५ ते २० मिमी. पावसाची नोंद झाल्यानंतर जिथे पाणी तुंबले जायचे, तिथे सोमवारी ३५ मिमी. पाऊस पडूनही पाणी तुंबले नाही. मिनी पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर गांधी मार्केट येथे पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाणी समस्येला पूर्णविराम मिळाल्याचा विश्वास नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केला. या लघू उदंचन केंद्राची क्षमता दर मिनिटाला २. ३३ लक्ष पाणी उत्सर्जित करण्याची असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.

समाधानाची बाब

याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर अजून तसा मोठा पाऊस आला नव्हता. पण सोमवारी ३५ मिमी. एवढा पाऊस पडूनही पाणी तुंबले नाही ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. कारण एरव्ही पाणी तुंबल्यानंतर वाहतूक वळवावी लागायची, पण सोमवारी चारही लेनची वाहतूक सुरु होती, असे एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.

(हेही वाचाः कोविड रुग्णांवर अँटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्वी! काय आहे हा नवा प्रयोग?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here