पुण्यात दुचाकी चालवताना हेल्मेट वापणारी व्यक्ती ही पुणेकर समजली जात नाही, असं पुणेकर फार अभिमानाने सांगतात. पण आता त्यांच्या याच जाज्वल्य अभिमानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांनी पुण्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता हेल्मेट घालणे बंधनकारक असल्यामुळे पुणेकरांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.
दुचाकीस्वारांना अपघाती मृत्यूचा अधिक धोका
हेल्मेट न घालता दुचाकी चालवणा-या दुचाकीस्वारांना मृत्यूचा धोका जास्त संभवतो. वाहन अपघातात आपले प्राण गमावणा-या व्यक्तींमध्ये सुमारे 80 टक्के व्यक्ती दुचाकी आणि सायकलस्वार आहेत. चारचाकी चालकांच्या तुलनेत दुचाकी चालकांना अपघाती मृत्यूचा धोका सातपट अधिक संभवतो. अपघातात दगावणा-या दुचाकी चालकांमध्ये तब्बल 62 टक्के व्यक्तींचा मृत्यू हा डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे होत असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी)
जीव वाचवण्यासाठी निर्देश
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने दिलेले निर्देश आणि मोटार वाहन कायद्यानुसार भारतात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणा-या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे दुचाकी अपघातात जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा आदेश काढला आहे. त्यानुसार 4 वर्षांवरील सर्वांना आता हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.
शासकीय कर्मचा-यांना बंधनकारक
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व दुचाकीचा वापर करणा-या सर्व अधिकारी, कर्मचा-यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. जनतेला मार्गदर्शक ठरावे आणि सहप्रवासांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
(हेही वाचाः टोलच्या दरांत मोठी वाढ! 1 एप्रिलपासून असे असणार नवीन दर)
Join Our WhatsApp Community