पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ दिसला अजगर

59

आरेत वाढत्या वाहनांच्या हालचालींमुळे निशाचर प्राण्यांना  त्रास होत आहे. जंगलातील रस्ते पार करणेच अवघड होत असल्याने सरपणारे प्राणी आता चक्क जंगलाच्या वेशीवरच राहणे पसंत करत आहे. परिणामी जंगलातल्या सरपटणा-या प्राण्यांचे दर्शन होत, असल्याने प्राणीप्रेमींना बचावासाठी तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे.

अन् झाली अजगराची सुटका

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका अभिनेत्याला सहा फूटांचा अजगर आरे वसाहतीलगतच्या स्मशानभूमीकडे दिसला. अजगर दिसल्याने धास्तावलेल्या अभिनेत्याने त्वरित ‘प्लान्ड ऍण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’ (पॉज) या प्राणीप्रेमी संस्थेला अजगराबाबत माहिती दिली. स्मशानभूमी पश्चिम द्रूतगती मार्गाजवळ असल्याने अजगर रस्ता ओलांडायला गेल्यास वाहनाखाली येऊन चिरडला जाईल, अशी भीती होती. ‘पॉज’ या संस्थेचे स्वयंसेवक सुनील गुप्ता यांनी अजगराला तिथून सुखरुप बाहेर काढले. अजगराची शारिरीक तपासणी केली असता तो व्यवस्थित दिसून आला. त्याला जंगलात सुखरुप सोडल्याची माहिती ‘पॉज’ संघटनेचे अध्यक्ष सुनीश कुंजू यांनी दिली.

आरेतील ‘या’ जागी अजगराचा अधिवास

आरेतील मेट्रो ३ कारशेडची जागा ही मुळात अजगराचा अधिवास आहे. या जागेतील असंख्य झाडे तोडली गेली आणि अजगराचा अधिवास नष्ट झाला, अशी खंत आदिवासी संवर्धन समितीचे कार्यकर्ता प्रकाश भोईर यांनी दिली.याआधीही आरेच्या वेशीकडील भागांत अजगर आढळून आल्याचे स्थानिक सांगतात. अंधेरीतील द्रूतगती मार्गावरही अजगर आढळून आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आरेतील स्थानिक आदिवासींनी सरपटणा-या प्राण्यांचा मानवी वसाहतीजवळ जास्त येण्यामागे कच-याचे विघटन योग्य होत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले.

आरेतील मानवी हस्तक्षेप थांबवा

दहा वर्षांपूर्वी आरेतील प्रवेशासाठी टोल आकारणी केली जायची. परिणामी वाहनांची संख्या मर्यादित होती. आता पैशाची आकारणी होत नसल्याने वाहनांच्या रांगा आरेत दिसून येतात. परिणामी सरपटणा-या प्राण्यांना रस्ता पार करणे अवघड झाले आहे. रात्री घोरपड, सरपटणारे प्राणी वाहनांखाली चिरडले जाण्याचा प्रकार वाढलाय. परिणामी सरपटणारे प्राणी एकाच जागी खोळंबून राहताहेत. लोकांना साप दिसला की, मग प्राणीप्रेमी संघटनांना तक्रार केली जातेय. सरकारने आरेतील वाहनांच्या वेळेवर मर्यादा घालावी.

(हेही वाचा :…यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.