Hording : मोठ्या जाहिरात फलकांबाबत रेल्वे प्रशासनही आजही उदासिनच, सोमवारी होणार कार्यवाहीची दिशा स्पष्ट

161
Hording : मोठ्या जाहिरात फलकांबाबत रेल्वे प्रशासनही आजही उदासिनच, सोमवारी होणार कार्यवाहीची दिशा स्पष्ट

रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक हे महापालिकेच्या धोरणानुसार ४० बाय ४० फुटांचेच असावेत अशाप्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही आजही रेल्वेकडून याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर येत आहे. रेल्वेच्या हद्दीतील २९ जाहिरात फलकांच्या आकार मोठा असून जाहिरात कंपन्यांना महापालिकेच्या धोरणानुसार फलकांचा आकार कमी करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न होत नसल्याची बाब समोर येत आहे. (Hording)

घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक दुर्घटनेनंतर मोठ्या आकाराच्या फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकांच्या विरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही. असे असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महानगरपालिका रस्‍ते तथा खासगी जागा बांधकामे यांच्‍या लगतच्‍या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचे आढळून आले आहे. हे पाहता घाटकोपरमध्‍ये घडलेल्‍या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा ओढावू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीतील ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्‍याचे निर्देश मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने देण्‍यात आले होते. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या याचिकेवर महापालिकेच्या बाजुने निर्णय देत महापालिकेच्या धोरणानुसारच जाहिरात फलकांचा आकार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. (Hording)

(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग नको!)

मुंबईत रेल्वेच्या हद्दीत ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या आकाराची एकूण ४५ जाहिरात फलक असून त्यातील दोन फलक कोसळले आहेत. तर घाटकोपर दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील मोठ्या आकाराचे जाहिरात फलक महापालिकेने काढून टाकले आहे. त्यामुळे उर्वरीत २९ मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकांचा प्रश्न असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही तातडीने रेल्वेकडून या फलकांचा आकार कमी केला जात नाही. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भायखळा आणि गोरेगाव येथील जाहिरात फलकांचे आकार जाहिरात कंपन्यांनी कमी केले आहेत, पण उर्वरीत फलकांचे आकार कमी केलेले नाही. दरम्यान, सोमवारी महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये जाहिरात फलकांबाबत बैठक पार पडणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे. (Hording)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.