उंदराने रुग्णाला नव्हे, आरोग्य यंत्रणेला कुरतडले!

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रीया कक्ष आणि आयसीयू, आयआयसीयू हे निजंर्तुक ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही अशाप्रकारे जर उंदरांचा वावर असेल तर मग या कोट्यवधी रुपयांच्या निजंर्तुक प्रक्रीयेचा उपयोग काय?

166

मागील आठवड्यात राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्याचा भाग उंदराने कुरतडला. हा रुग्ण काही सर्वसाधारण कक्षात उपचार घेत नव्हता. तर तो आयसीयूमध्ये दाखल होता. आयसीयू कक्ष हा कशाप्रकारे बंदिस्त असतो आणि तो निजंर्तुक असतो हे सर्वांनाच माहित आहे. अशा कक्षामध्ये उंदराचा वावर होतो कसा? उंदिर आतमध्ये या बंदिस्त अशा कक्षात येतात कसे? जर उंदिर या कक्षात येत असतील आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना होती आणि तरीही ते तिथे लक्ष देत नसतील तर सर्वांत गंभीर बाब आहे. मुळात रुग्णालयात उंदिर नसावेतच. आणि आयसीयू कक्षात तर उंदरांना प्रवेश निषिध्दच आहे. मग महापालिकेच्या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी काय डोळ्यावर पट्टी लावून उपचार करतात काय? अशाप्रकारे जेव्हा उंदिर आयसीयूमध्ये फिरतात किंवा सर्वसाधारण कक्षात फिरत असतात, असे जेव्हा तेथील डॉक्टर, नर्सेस किंवा आयाबाई, वॉर्डबॉय यांच्या निदर्शनास आले होते, तेव्हाच त्यांनी रुग्णालयाच्या मेंटनन्स विभागाला कल्पना द्यायला हवी होती. त्यांनी याची कल्पना रॅट किलरला दिली असती. पण उंदिर काय करणार? फिरणार आणि जाणार. रुग्णांचा त्याचा अपाय होणार नाही, याच विचाराने कर्मचारी जे वावरत गेले, त्या त्यांच्या निष्काळजीपणामुळे राजावाडी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या श्रीनिवास यल्लपा या तरुणाच्या डोळ्याला चावा घेवून गेला.

…तर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास उडेल!

हा रुग्ण किडनी निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर एकप्रकारे ब्रेन डेड सारखाच होता. तो बेशुध्द अवस्थेत होता. जर त्याला शुध्द असती तर त्यांने उंदराने जसं त्यांच्या शरीरावर चाल केली, तसं त्यांनं हालचाल करत त्याला उडवून दिलं असतं. आरडाओरड झाला असता. पण तो रुग्णच शुध्दीत नसल्याने उंदराने कुरतडण्याचा क्रीडा प्रकार सुरु केला आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सोडलं. खरं तर उंदिर हा कुठल्या घाणीतून किंवा कोणकोणत्या आजारांच्या रुग्णांच्या बेडवरून, टाकावू साहित्यांमधून  फिरत असतो. तो फिरताना अनेक आजारांचा संसर्ग घेवून फिरत असतो. त्यामुळे सर्वप्रथम तर त्याने त्या रुग्णाला कुरतडून एकप्रकारचा अनेक आजारांचा संसर्ग पसरवला. आणि यामाध्यमातून महापालिकेचे आयसीयू हे निजंर्तुक नाही यावर सर्वांचा विश्वास बसला. खरं तर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रीया कक्ष आणि आयसीयू, आयआयसीयू हे निजंर्तुक ठेवण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च केले जातात. तरीही अशाप्रकारे जर उंदरांचा वावर असेल तर मग या कोट्यवधी रुपयांच्या निजंर्तुक प्रक्रीयेचा उपयोग काय? रुग्णाची प्रकृती दाखल केल्यापासून गंभीर होती. परंतु कुठल्याही नातेवाईकाला आणि डॉक्टरांसाठी तो रुग्ण वाचलाच गेला पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे डॉक्टर आणि नातेवाईकांचा त्याला वाचवण्याचा प्रयत्न होता. पण त्याचे सर्वच अवयव  निकामी झाल्याने तो वाचू शकणार नव्हता. म्हणून काही त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे योग्य नाही. तो रुग्ण आज ना उद्या जाणारच होता. पण उंदराने त्याला कुरतडून एवढं मोठं केलं की यामध्ये राजावाडी रुग्णालय तर बदनाम झालंच, शिवाय महापालिकेची आरोग्य यंत्रणेवरचाही विश्वास उडाला. या घटनेनंतर जी महापालिकेच्या रुग्णालयांची आणि आरोग्य विभागाची बदनामी झाली आहे, ती कोविड काळात केलेल्या सर्व कामांवर त्यामुळे पाणी फेरले गेलं.

(हेही वाचा : अखेर महापालिकेने स्पुटनिक लस खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला!)

रुग्णालयातील कर्मचारी आणि संवेदनशीलता!

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची ख्याती जगात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असल्याने देशातील कानाकोपऱ्यातून रुग्ण याठिकाणी येत असतात. आणि महापालिका कोणत्या भागातून आलात. कोणत्या प्रांतातून आलात, याची विचारणा न करता रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी महापालिकेच्या या रुग्णालयातील डॉक्टर शर्थीने प्रयत्न करत असतात. महापालिका हे सर्व उपचार मोफत तथा सवलतीत दिले. जिथे खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येतो, तिथे हजारांमध्ये हे काम केलं जातं. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वात चांगली वैद्यकीय सेवा दिली जात असतानाही कायम महापालिकेला बदनामीला सामोरं जावं लागतं. याचं कारण म्हणजे येथील बेशिस्त कर्मचारी. डॉक्टर मंडळी ही रुग्णांशी तोंडात साखर ठेवून बोलत असले तरी नर्सेस, आयाबाई या जणू काही रुग्णांच्या नातेवाईकांवर मोठे उपकारच करत असल्यासारखे बोलत असतात. राजावाडीतील घटनेतही याच प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा माथा सटकला. जर रुग्णाच्या नातेवाईकाला त्याच्या डोळ्याखाली पट्टी दिसते आणि ती उघडून बघितल्यानंतर तिला तिथे जखम दिसते. अर्थात रुग्णाची नातेवाईक सेव्हन हिल्समध्ये कंत्राटी तत्वावर नर्सचं काम करत असल्याने तिने ही हिंमत केली. दुसऱ्या कोणी नातेवाईकाने केली नसती. पण याची विचारणा केल्यानंतर तेथील नर्सनी जे वर्तन केलं हेही शोभनिय नाही. आम्ही दोघीच आहोत. सर्वांकडेच बघायला आम्हाला वेळ नाही, हे जे काही तेथील नर्सचं विधान आहे, हे खरं तर रुग्णाच्या नातेवाईकांचा पारा वाढवणारा असतो. आपला माणूस रुग्णशय्येवर आहे. त्यामुळे नातेवाईक हे चिंतेत असतात. त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये असणाऱ्या नातेवाईकांशी जेव्हा तेथील कर्मचारी अरेरावीची भाषा करतात, तेव्हा कुणाचं टाळकं सटकणार नाही. प्रत्येक वेळी रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीचे दर्शन होते, तेव्हा मग त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांशी कशाप्रकारे संवाद साधायचा याचे प्रशिक्षण देण्याचा मुद्दा समोर येतो. पण घटनेचे पडसाद कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्मचारी ये रे माझ्या मागल्या याप्रमाणेच वर्तन करत असतात. आज महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी आहे. पगार चांगला आहे. आपण काय केलं तरी आपल्याला कोण कामावरून काढणार या समजुतीमुळे त्यांच्याही वर्तनात हा बदल होतो. मुळात दिवसाला अशाप्रकारच्या अनेक रुग्ण आणि विविध प्रवृत्तीच्या नातेवाईकांना तोंड देताना त्यांच्यातील संवेदनशीलता संपलेली असते. त्यामुळे ते तसं वागतही असतील.

महापालिकेची बदनामी होऊ देऊ नका! 

महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये एक फरक आहे. महापालिकेत मोफत उपचार तर खासगीमध्ये त्यासाठी पैसे मोजले जातात. पण ज्या खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा बाजार मांडला जातो, तिथे महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णसेवेला प्राधान्य दिलं जातं. खासगी रुग्णालयांमध्ये आपण जे पैसे मोजतो, त्याप्रमाणे आपल्याला वागणूक आणि मानसन्मान दिला जातो. कारण तो सर्व पैशांचा खेळ आहे. तिथे पैसे मोजले जातात म्हणून तेथील कर्मचाऱ्यांकडून तशी वागणूक दिली जाते. पण तशीच वागणूक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नातेवाईकांना मिळेल अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मोजकेच रुग्ण असतात आणि खाटा फुल्ल असतील तर ते दाखलही करूनही घेत नाही. त्या ऊलट महापालिकेची रुग्णालये. जिथे खाटा भरल्यानंतरही लादीवर गादी टाकून त्यावर उपचार देतील. पण रुग्णाला कधीही उपचाराशिवाय परत पाठवणार नाही, हे महापालिका रुग्णालयाचे संस्कार आहे. पण मोफत देवूनही मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा बदनाम होते याचे दु:ख आहे. आज महापालिका मोफत उपचार रुग्णालयांमध्ये देत असली तरी तो करदात्यांचा पैसा आहे. आणि महापालिकेचे कर्मचारी जो पगार घेतात तोही करदात्यांचा आहे. त्यामुळे किमान महापालिकेची बदनामी आपल्यामुळे होणार नाही याची काळजी प्रत्येक कर्मचाऱ्याने घ्यायला हवी. तसेच आपण रुग्णांवर उपकार करत नाही तर महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य निभावतो, हेच प्रत्येकाच्या मनात आणि डोक्यातही पाहिजे.

(हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आता अशीही होणार भर)

महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुरतडणार नाही याची काळजी घ्या! 

राजावाडीत जे घडलं, तो प्रकार महापालिकेच्या रुग्णालयात प्रथम घडला का? तर नाही!  यापूर्वीही कांदिवलीतील शताब्दी आणि आताच डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना कुरतडण्याचे प्रकार उंदरांकडून झालेले आहेत. पण त्यातून पुढे आपण काय शिकलो. घटनेची तीव्रता कमी झाली कि  प्रत्येकाने पुन्हा एकदा बेताल आणि बेशिस्त वागायला सुरुवात होते. मुळात कांदिवलीतील घटनेनंतर रुग्णालयातील पाईप, कक्षातील छताचा भाग, दरवाजा आदी भागांची काळजी घेवून त्यातून उंदिर येणार नाही अशाप्रकारे बंदिस्त करण्याची मोहिम राबवली होती. पण एकदा हे काम केले की पुढे कोण तिथे बघतोय. जर ही मोहिम दर सहा महिन्यांनी राबवून त्याप्रमाणे उंदरांचा प्रवेशमार्ग बंद करण्यावर भर दिला गेला तर राजावाडीच काय तर अन्य रुग्णालयांमध्येही असे प्रकार पुन्हा होणार नाही. परंतु प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना हे सांगावं लागतं. स्वत: पुढाकार घेवून कधी ते कामच करत नाही. खरं तर जेव्हा अशाप्रकारची घटना घडते तेव्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधिक्षक हेच बदनाम होतात. त्यांच्यावरच टीका होते. परंतु त्यांचा दोष काय? खरं तर ही मंडळी डॉक्टर आहेत. ते आपला पेशा व्यवस्थित सांभाळत आहे. त्यांच्यावर आपण प्रशासकीय कामांचा बोजा लादून त्यांना ना वैद्यकीय कामे करू देत ना प्रशासकीय कामे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयांमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सहायक आयुक्तांची सीईओ म्हणून नेमणूक करण्याचा तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार नियुक्तीही झाली होती. परंतु जेव्हा चांगली कामे होतात, तेव्हा विरोधाचा आगडोंब उसळतो आणि त्यात मग अशा संकल्पना भस्मसात होतात. तोच प्रकार झाला. जर रुग्णालयांमधील वरिष्ठ डॉक्टरांना प्रशासकीय कामांमधून मुक्त केल्यास त्यांच्याकडून अधिक चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा होती. पण चांगले काम व्हावे अशी कुणाचीही इच्छा नसते. असो, राजावाडी रुग्णालयामुळे महापालिकेची आरोग्य सेवा कशाप्रकारे कुरतडली जावू शकते हे एका उंदराने दाखवून दिले आहे. उंदरामुळे घडलेली ही सत्य घटना असली तरी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुठेही अशाप्रकारे कुरतडली जावू नये, याची काळजी घेणेही तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने डोळयात तेल घालून तिथं लक्ष द्यायला हवं. कारण आज कोविडच्या रुग्णांकडे लक्ष आहे. कोविडशिवाय आपण अन्य विचारच करत नाही. पण कोविड बरोबरच महापालिकेच्या आरोग्य विभागाला इतर आजारांवरही चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा देता यावी यासाठीही तेवढंच सक्षम बनवणं आवश्यक आहे. तेव्हा महापालिकेने आपली आरोग्य यंत्रणा कुठेही कुरतडली जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, हीच अपेक्षा!!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.