…म्हणून मुंबईतील लस जातात परत

मुंबई बाहेरील व्यक्ती केंद्र दूर असल्याने किंवा त्यांच्या लक्षात न राहिल्याने ते नोंदणी केलेल्या दिवशी लसीकरणासाठी येत नाहीत. त्यामुळे शिल्लक राहिलेला लस साठा परत पाठवला जातो.

79

लसीकरणासाठी जिथे गर्दी कमी आहे, तिथे मुंबई बाहेरील नागरिक नोंदणी करताना दिसत आहेत. परंतु नोंदणीनंतर प्रत्यक्षात यादीतील व्यक्ती लसीकरणाला दांडी मारत असल्याने, त्यांच्यासाठी आलेल्या लस पुन्हा माघारी पाठवाव्या लागत आहेत. त्यामुळे आधीच केंद्रांमध्ये लसींचा साठा येत नाही. तसेच मुंबई बाहेरील व्यक्ती नोंदणी करुनही केंद्र लांब असल्याने लसीकरणाला येत नसल्याने, नियोजित लसींपैकी उर्वरित लसी या परत पाठवाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.

असा वाढतोय लसीकरणाचा ‘ताप’

मुंबईत सध्या लसीकरणासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच प्रशासनाने वॉक इन पध्दतीने लसीकरण बंद केल्यामुळे नोंदणी केलेल्यांनाच केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. मात्र, आता मुंबई बाहेरील व्यक्ती मुंबईतील केंद्रांमध्ये नोंदणी करत आहेत. त्यामुळे ही नगरसेवकांची डोकेदुखी बनली आहे. त्यातच आता मुंबई बाहेरील व्यक्ती केंद्र दूर असल्याने किंवा त्यांच्या लक्षात न राहिल्याने ते नोंदणी केलेल्या दिवशी लसीकरणासाठी येत नाहीत. त्यामुळे शिल्लक राहिलेला लस साठा परत पाठवला जात असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रच ठरणार नगरसेवकांची डोकेदुखी)

नगरसेवकांची खंत

डोस वाया जात असल्याने तो वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक केंद्रांमधून केला जात आहे. कोणतीही नोंदणी केलेली एखादी व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी लसची बॉटल्स उघडल्यावर त्यातील उर्वरित डोस वॉक इन पध्दतीने दुसऱ्या डोसच्या व्यक्तींना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खुद्द यासाठी प्रत्येक नगरसेवक व लोकप्रतिनिधी मेहनत घेताना दिसत आहेत. मुंबईला दरदिवशी सुमारे २५ हजार लससाठा उपलब्ध होतो. परंतु २२७ नगरसेवकांना सरासरी ११० लसींचे वाटप हेाते. त्यातूनही जर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लस दिल्यास, नगरसेवकांच्या वाट्याला ८० ते ९० लसच येतात. पण त्यातही मुंबई बाहेरील व्यक्ती तसेच नोंदणी केलेल्या व्यक्ती न आल्याने, बऱ्याचदा यातील काही लस परत पाठवल्या जात असल्याची खंत भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली.

(हेही वाचाः सांभाळा… मुंबईत म्युकरमायकोसीसचे १११ रुग्ण!)

आधीच पुरेशा प्रमाणात लस मिळत नाही अणि दुसरीकडे अशाप्रकारे परत पाठवायची वेळ येते. त्यामुळे केंद्रांमधून लस परत पाठवण्याऐवजी त्या वॉक इन पध्दतीने नागरिकांना दिल्या जाव्यात. तसेच यासाठी शहर विभाग, पूर्व उपनगर विभाग आणि पश्चिम उपनगर विभागांसाठी स्वतंत्र स्लॉट निर्माण केला जावा, जेणेकरुन लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.