मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्रात सोमवार, 24 मार्च रोजी नुतनीकृत अणुऊर्जा दालनाचे अर्थात हॉल ऑफ न्युक्लिअर पॉवरचे उद्घाटन होणार आहे. भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भुवन चंद्र पाठक यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन होईल. (NSC Mumbai)
यापूर्वी 2011 मध्ये या अणुऊर्जा दालनाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर आता अणु तंत्रज्ञानातील अत्याधुनिक प्रगती दर्शवण्याच्या उद्देशाने या दालनाचे नूतनीकरण केले गेले आहे. हे दालन 700 चौरस मीटर क्षेत्रात उभारले गेले आहे. या दालनात 70 परस्परसंवादी प्रदर्शने मांडली आहेत. या प्रदर्शनांसाठी एआर-व्हीआर तंत्रज्ञान, डायोरामा, ध्वनीचित्रफिती तसेच व्हर्च्युअल वॉकथ्रू अशा विविध माध्यमांचा वापर केला असून, त्यामुळे दालनाला भेट देणाऱ्यांना संस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. याशिवाय या दालनाला भेट देणाऱ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून अणु विखंडन, अणुभट्टी संचालन, किरणोत्सर्ग सुरक्षा, अणु कचरा व्यवस्थापन आणि निव्वळ – शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यातली अणुऊर्जेची भूमिका यांसारख्या विषय अभ्यासण्याची संधीही मिळणार आहे. (NSC Mumbai)
(हेही वाचा – World Meteorological Day: ‘असा’ साजरा करतात ‘जागतिक हवामान दिन’; जाणून घ्या इतिहास)
या दालनाच्या माध्यमातून, अणु प्रक्रियेचा वीज निर्मितीसाठी होणाऱ्या उपयोगाशिवाय, त्याचा औषधोपचार, कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी असलेल्या उपयोगितेविषयीची माहितीही भेट देणाऱ्यांना जाणून घेता येणार आहे. या दालनातील प्रदर्शनाच्या माध्यमातून अभ्यागतांना अणुऊर्जा प्रकल्पाची व्हर्च्युअल सफर घडवून आणली जाणार आहे. त्यामुळे अभ्यागतांना अणुभट्टीच्या अंतर्गत कामकाजाचा आभासी अनुभव घेण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांचा अणु तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढण्यासाठीही मदत होणार आहे. (NSC Mumbai)
भारताची ऊर्जेची मागणी सातत्याने वाढते आहे. अशावेळी अणुऊर्जा हा एक स्थिर, दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक ठरणारा उपाय असणार आहे. 1959 मध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी त्रीस्तरीय अणु कार्यक्रमाची कल्पना मांडली होती, आज हीच कल्पना भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेचा पाया ठरली आहे. अर्थात असे असूनही अणु सुरक्षेबाबत लोकांच्या मनातील शंका अद्यापही कायम आहेत. याच पार्श्वभूमीवर अणुउर्जेशी संबंधीत नागरिकांना असलेल्या ज्ञानातील दरी भरून काढण्याच्या उद्देशानेच या नूतनीकरण केलेल्या दालनाची रचना केली गेली असून, या माध्यमातून भारताच्या अणुऊर्जा प्रगती आणि सुरक्षा उपायांबद्दल पारदर्शक, तथ्यांवर आधारित माहिती अभ्यागतांना मिळू शकणार आहे. (NSC Mumbai)
(हेही वाचा – Financial Rule : एप्रिलमध्ये होणार ‘हे’ महत्त्वाचे आर्थिक बदल)
भारतीय अणुऊर्जा महामंडळ मर्यादित (NPCIL) विषयी
भारतीय अणुऊर्जा महामंडळ हा भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारितील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांचे संरचनात्मक आरेखन, उभारणी, संचालन आणि देखभालीची जबाबदारी भारतीय अणुऊर्जा महामंडळाच्या अखत्यारित येते. याशिवाय अणु सुरक्षा, पर्यावरणाचे संवर्धन आणि अणुऊर्जेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही ही संस्थात्मक व्यवस्था वचनबद्ध आहे. (NSC Mumbai)
नेहरू विज्ञान केंद्राविषयी
मुंबईतील नेहरू विद्यान केंद्र हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेची एक शाखा आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र हे आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान केंद्रांपैकी एक आहे. (NSC Mumbai)
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेविषयी (NCSM)
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद ही भारतातील विज्ञान विषयक माहिती आणि ज्ञानाच्या देवाण घेवाणीची एक प्रमुख संस्था आहे. या परिषदेअंतर्गत 26 विज्ञान केंद्रे आणि 48 फिरत्या विज्ञान प्रदर्शनासारख्या उपक्रमांचे मोठे जाळे कार्यरत आहे. (NSC Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community