महागाई कमी होताना दिसत नाही. आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया बुधवारी आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच तसे संकेत दिले असल्याने गृह, वाहन कर्जाचा ईएमआय आणखी वाढणार आहे. याचा नागरिकांना थेट फटका बसणार आहे.
केंद्रीय बॅंकेने गेल्या महिन्यात कोणताही कार्यक्रम ठरलेला नसाताना अचानक धक्का देत पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. बुधवारी होणा-या आढाव्यातही रेपो दर किमान 0.35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणतात गव्हर्नर
दास यांनी नुकतेच सांगितले आहे की, रेपो दरांमध्ये वाढ होणार आहे. परंतु ती किती असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही. बॅंक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी एमपीसीच्या बैठकीत सांगितले की, महागाईबाबत आरबीआय कठोर पावले उचलत आहे. त्यामुळे रेपो दरात नक्की वाढ केली जाईल.
( हेही वाचा: मुंबईत कोरोनाचा विस्फोट… राज्यातील आकडेवारी जाणून घ्या )
कर्जदारांनी काय करावे
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय पुढील काही महिने रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅंकाही व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी यावेळी फ्लोटिंग ऐवजी फिक्स्ड रेट ठेवून कमीत कमी व्याजदराचा फायदा घ्यावा.