‘Hit and run’च्या घटनांमधील वाढ चिंताजनक

122
'Hit and run'च्या घटनांमधील वाढ चिंताजनक
'Hit and run'च्या घटनांमधील वाढ चिंताजनक

राज्यात एका मागोमाग एक हिट अँड रन प्रकरणे घडत आहेत. नुकतेच मुंबईत मिहीर शहा (Mihir Shah) या तरुणाने दुचाकीवर स्वार पती-पत्नीला धडक देत, त्यातील महिलेला २ किमी फरफटत नेले, त्यात महिलेचा मृत्यू झाला. याआधी वेदांत अग्रवाल (Vedanta Aggarwal) या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर स्वार तरुण-तरुणीला उडवले. यात दोघांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे राज्यात अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत. (Hit and run)

मद्यधुंद तरुणांच्या वाहनाने फुटपाथवरील ८ जणांना चिरडले

नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी चौकाजवळ काही मित्र पार्टी करून परतत असताना मद्यधुंद अवस्थेत १७ जून रोजी, रविवारी पहाटेच्या सुमारास फुटपाथवर झोपलेल्या ८ जणांच्या अंगावर मोटार चढवली, या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी मोटारचालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. (Hit and run)

(हेही वाचा – Mukhyamantri Tirth Darshan Yojana: भक्तांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेचा निघाला GR )

ठाण्यात चार महिन्यांत १५९ हिट अँड रनच्या घटना

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत हिट अँड रनच्या तब्बल १५९ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला असून १०६ जण जखमी झाले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पब, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार, ढाबे आणि रेस्टॉरंट आहेत. रात्रीच्या वेळी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील मद्यपी या ठिकाणी वाहनांमधून येत असतात. मद्यपान केल्यानंतर वाहने चालवणाऱ्या चालकाकडून मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात.

पिकअप चालवणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने दोघांना उडवले

पुण्यातील शिरूर येथे ३१ मे रोजी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने विरुद्ध दिशेहून येणाऱ्या एका पिकअप वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक देत २० फूट फरफटत नेले, या अपघातात दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता. या अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे हे पिकअप वाहन १५ वर्षांची मुलगी चालवत होती व तिचे वडील शेजारी बसले होते. या अपघाताप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पिकअप वाहन चालक मुलगी आणि तिच्या पित्याला अटक केली.

अज्ञात वाहनाने सायकलस्वार तरुणाला उडवले

नागपुरात एका ठिकाणी जेवण झाल्यानंतर ९ जुलै रोजी मोटारसायकलवरून फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या राहुल टेकचंद खैरवार (२३) या तरुणाला सांदीपनी शाळेसमोरील दाभा रिंग रोडवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राहुल खैरवार गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी या तरुणास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरू केला आहे.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय म्हणाले, घटस्फोटीत Muslim महिलेला पोटगी द्या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार म्हणते, आम्ही शरियत कायदे मानतो)

भरधाव वाहनाने पादचारी महिलेला धडक

नाशिकमधील गंगापूर रोड जवळील बारदान फाट्याजवळ ९ जुलै रोजी एका भरधाव मोटारीने एका पादचारी महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून मोटारीसह पळ काढला.

रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक; आरोपी फरार

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ जून रोजी रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव मोटारीने धडक दिली, या अपघातात महिला गंभीररीत्या जखमी झाली. या अपघातानंतर मोटार चालक फरार झाला. यात पोलिसाचा मुलगा विनय विलास नाईकेरे याला अटक करण्यात आली. (Hit and run)

स्कूल बसच्या चालकाने सायकलस्वाराला उडवले

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा चौक परिसरात ९ जुलै रोजी रत्नाकर रामचंद्र दीक्षीत (६३) हे त्यांच्या सायकलने काही कामानिमित्त या परिसरातून जात होते. त्याचवेळी स्कूल बस चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात बस चालवली असता बसची धडक रत्नाकर दीक्षित यांच्या सायकलला लागली. त्यामुळे ते खाली पडले आणि बसच्या मागच्या चाकाखाली आले. यानंतर परिसरातील लोकांनी जखमी रत्नाकर दीक्षित यांना उपचाराकरता मेडीकल रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी स्कूल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली.

(हेही वाचा – PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवं रेकॉर्ड! ‘एक्स’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले)

भरधाव कारने पती-पत्नीला उडवले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लेंभेवाडी फाट्याजवळ ९ जुलै रोजी धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील पती आणि पत्नी जागीच ठार झाले. सतीश शाहू मगरे आणि तेजल सतीश मगरे असे या पती – पत्नीचे नाव आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला.

(हेही वाचा – Konkan Heavy Rain : कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग; कोकण रेल्वे ठप्प )

धावत्या मोटारीत रिल्स बनवण्याचा नादात अपघात

नागपूरच्या कोराडी मार्गावरील पांजारा येथे मंगळवार, ९ जुलै रोजी पहाटे विक्रम गादे आणि आदित्य पुण्यपवार हे दोघे इतर तीन मित्रांसह मोटारीने नागपूर येथून कोराडीच्या दिशेने निघाले होते, भरधाव मोटारीत हे पाचही तरुण स्टंट करून इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी मोबाईलवर रिल्स बनवत असताना चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या मोटारीने दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात विक्रम गादे आणि आदित्य पुण्यपवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. (Hit and run)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.