मागील ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अखेर मार्गी लागले आहे. मालाड येथील एस.व्ही. रोडवरील अतिक्रमण दूर करण्यात आले असून, मालाडमधील टेलिफोन एक्स्चेंज ते मालाड शॉपिंग सेंटर दरम्यानचा हा अरुंद मार्ग आता रुंद केल्यामुळे या भागातील वाहतुकीची गती वाढणार आहे.
भाजपा नगरसेविकेने केला मार्ग खुला
स्वामी विवेकानंद मार्गावरील मालाड भागातील रस्ता रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्याचा फटका स्वामी विवेकानंद मार्ग(एस.व्ही. रोड)वरील वाहतुकीला बसत होता. येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे स्थानिक प्रभाग क्रमांक ४६ च्या भाजपा नगरसेविका योगिता कोळी यांनी सातत्याने पाठपुरावा करत महापालिकेच्यावतीने एस.व्ही. रोडवरील टेलिफोन एक्स्चेंज ते मालाड शॉपिंग सेंटर भागातील बाधित बांधकामांवर तोड कारवाई करत या मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला केला.
(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)
होणार विनाअडथळा प्रवास
येथील रुंदीकरणातील बाधित बांधकामे तोडण्यात आल्याने आता रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. जेणेकरुन रुंद झालेल्या या रस्त्यावरुन विनाअडथळा प्रवास करता येईल, असे नगरसेविका योगिता कोळी यांनी स्पष्ट केले. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत योगिता कोळी यांनी या मार्गावरील बाधित बांधकामे तोडून रस्ता रुंदीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असून, ते पूर्ण करण्यात यश आल्याने मला आनंद होत असल्याचे योगिता कोळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी खासदार गोपाळ शेट्टी, मंडळ अध्यक्ष सुनील कोळी, महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, सहायक आयुक्त व अधिकारी यांचे विशेष आभार मानले आहेत.
(हेही वाचाः शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ)
Join Our WhatsApp Community