मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता आता मोकळा : अतिक्रमणांवर कारवाई करताना सार्वजनिक शौचालयही तोडले

143

मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेरील एस.व्ही.पी. मार्ग आणि जे.एस.डी. मार्गावरील अनधिकृत व अतिक्रमण बांधकामांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जात असून एकाच दिवशी एकूण १७ दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाई दरम्यान दुकानांच्या मधोमध असलेल्या एका ‘पे अँड यूज टॉयलेट’चे नुकसान झाले. या स्वछतागृहाच्या भिंतीला तडे गेले असून हे स्वच्छतागृह असुरक्षित झाल्याचे लक्षात घेता पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून कारवाई दरम्यान तेही पाडण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ ६) देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व टी विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानका बाहेरील राजेंद्र प्रसाद रोड सिध्दार्थ नगर येथील २०० चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. गेली अनेक वर्षे ही कारवाई प्रलंबित होती. यापूर्वी माननीय शहर दिवाणी न्यायालयाने २९ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये या अतिक्रमण धारकांना नोटीस बजाविली होती. ३ मार्च २०२० रोजी हे अतिक्रमण पाडण्याचा प्रस्ताव प्रस्तावित होता. मात्र, कोविडमुळे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई प्रलंबित होती. याबाबत दुकानदारांनी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या नोटीसला आव्हान दिले होते. मात्र, शहर दिवाणी न्यायालय दिनांक २३ जानेवारी २०२३ आणि माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ आदेशांन्वये या अतिक्रमण धारकांची याचिका फेटाळण्यात आली.

(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारवाईत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली १७ बांधकामे आणि दुकाने पाडण्यात आली. मात्र, या कारवाई दरम्यान दुकानांच्या मधोमध असलेल्या एका ‘पे अँड यूज टॉयलेट’चे नुकसान झाले. या स्वछतागृहाच्या भिंतीला तडे गेले असून हे स्वच्छतागृह असुरक्षित झाल्याचे लक्षात घेता पादचा-यांच्या सुरक्षेचा विचार करून कारवाई दरम्यान ते देखील पाडण्यात आले आहे.

या कारवाईत टी विभाग कार्यालयाचे आणि रस्ते विभागाचे अभियंते, वेगवेगळ्या खात्यांचे कर्मचारी, मुकादम, कामगार तसेच जे.सी.बी., डंपरसह सदर जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाई प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, म्हणून या ठिकाणी नाल्याची बांधणी, पदपथ बांधणी आणि रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहे, अशी माहिती टी विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.