भारताची प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. भारतातील बहुतांश राज्य भाषांची उत्पत्ती मुळातच संस्कृत भाषेतून झाली. त्यामुळे या भाषेला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या व्यावसायिक जगात दुर्दैवाने नवी पिढी या भाषेपासून अलिप्त राहत आहे. त्यामुळे तरुणाईला संस्कृत भाषेचा परिचय व्हावा, त्यांच्यात या भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पुण्यातील पहिल्या गंधर्व सख्यम बँडची स्थापना करण्यात आली. या बँडच्या वतीने केवळ संस्कृत गीतांची निर्मिती केली जाते. या बँडच्या वतीने महाराष्ट्र गीताचे (Maharashtra Geet) संस्कृत भाषेत केलेले भावानुवादीत गीत तरुणांच्या पसंतीस पडत आहे.
या बँडचे ‘संस्कृतीश्री’ नावाचे युट्युब चॅनल आहे. २०१६ सालापासून या चॅनलच्या माध्यमातून बरीच स्वरचित संस्कृत भाषेतील गीतांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून या चॅनलवर ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या गीताचे (Maharashtra Geet) संस्कृत भाषेत ‘जयदिह महाराष्ट्र राज्यम्’ असे अनुवादित केलेले गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. हे संस्कृत भाषेतील अनुवादित गीत सर्वांच्या पसंतीस पडत आहे. ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनीही या गीताचे कौतुक केले आहे. युट्युब चॅनलवर या गीतावर मोठ्या संख्येने तरुणांनी त्यांचे अभिप्राय नोंदवले आहेत.
या महाराष्ट्र गीताचा (Maharashtra Geet) संस्कृत भाषेत अनुवाद संस्कृत भाषेचे प्राध्यापक, डॉ. श्रीहरी वासुदेव गोकर्णकर यांनी केले आहे, तर गीताचे गायन प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले आहे. डॉ. गोकर्णकर हे मागील २० वर्षांपासून संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर प्रांजल अक्कलकोटकर हे इतिहास विषयाचे प्राध्यापक असून ते दहा वर्षांपासून गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सोनी मराठी वाहिनीवर ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत ३९ अभंग गायिले आहेत. हे दोघेही ‘संस्कृतीश्री’ या बँडमध्ये कार्यरत आहेत.
Join Our WhatsApp Community