आफ्रिकन देशांमधून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरु

99

कोविड-१९ विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन, तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे या देशांत भारतात येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन केले जाणार असून मागील १५ दिवसांमध्ये जे मुंबईत परतले आहेत त्यांचा शोध घेण्याचे निर्देशदेखील महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महापालिका आयुक्तांशी चर्चा

कोविड-१९ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून मुंबईसह महाराष्ट्रात कोविड संसर्गजन्य परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला नुकताच धोक्याचा इशारा दिला आहे. काही आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून तो अत्यंत संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करून काही निर्देश दिले.

कोविड विषाणूचा ओमिक्रोन वर चर्चा

याच अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पोलिस प्रशासनाचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, इतर पोलिस अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य या सर्वांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोविड विषाणूचा ओमिक्रोन प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा ग्राहक दिसला विनामास्क, तर दुकान मालक, मॉल्स व्यवस्थापनाला होणार मजबूत दंड)

परदेशातून येणा-या नागरिकांची होणार कडक तपासणी

ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला, तर त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत किंवा काय याबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जीनोम स्क्विन्सिंग) पडताळावे. तसेच बाधिताच्या सान्निध्यातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सक्त सूचना देखील चहल यांनी दिल्या आहेत. नवीन विषाणूच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्देश दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास तपासणार

आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा लक्षात घेता अनेक देशांनी व विमान कंपन्यांनी सावध पावले टाकली आहेत. त्याच धर्तीवर मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. नवीन विषाणू प्रकाराने बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसांतील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना लवकरच प्राप्त होणे अपेक्षित असून त्यानुसार विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणी, अलगीकरण इत्यादींबाबत सविस्तर सूचना महानगरपालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात येतील, विमानतळावर व्यवस्था वाढवताना कोणतीही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने सुसज्ज राहावे, असे त्यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.