विणीच्या हंगामात राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलेले पाच मादी ऑलिव्ह रिडले कासव एकाच कासव समूहातील असल्याचा निर्वाळा भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार यांनी केला. चार महिन्यांपासून समुद्रातील त्यांच्या हालचाली पाहता त्यांनी गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टी समुद्रातील भ्रमणमार्गासाठी निवडली.
सॅटलाईट टॅगिगंमुळे अभ्यासकांच्या संपर्कात आलेल्या चारही मादी ऑलिव्ह रिडले कासवांची साम्यता असलेला समूह किमान ४०० कासवांचा असू शकतो, असाही अंदाज डॉ. आर. सुरेशकुमार यांनी वर्तवला.
(हेही वाचाः मान्सूनच्या आगमनाची सॅटलाईट टॅगिंग केलेल्या कासवांना चाहूल)
कासवांची भिन्न स्वभाव वैशिष्ट्ये
प्रथमा, सावनी, वनश्री आणि रेवा या चारही मादी ऑलिव्ह रिडले कासवांसह त्यांच्या समूहातील इतर कासवही नजीकच्या समुद्रातच भ्रमंतीचा आनंद लुटत आहेत. चारही कासवांची स्वभाव वैशिष्ट्येही निराळी आहेत. प्रथमा वेगवान आहे. सावनी, आणि रेवा यांना अन्नाची चाहूल लागताच त्यांचा भ्रमणमार्ग ठरतो. रेवाला अगोदरपासूनच आपला भ्रमणमार्ग ठाऊक आहे. रेवा वर्षभर कर्नाटक राज्यातील समुद्राजवळ राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
वनश्रीचे निराळेपण
या सर्वांत वनश्री काहीशी स्वभावाने निराळी आहे. सुरुवातीपासूनच फारसा खोल समुद्र न गाठलेल्या वनश्रीने चार महिन्यांत राज्याची किनारपट्टी सोडली नाही. दक्षिण कोकणात उपलब्ध असलेल्या अन्नातच ती सुखी असल्याचे डॉ. आर. सुरेशकुमार सांगतात.
(हेही वाचाः ऑलिव्ह रिडले कासवांपैकी ‘प्रथमा’चा मुंबई किनाऱ्याजवळ मुक्काम)
सॅटलाईट टॅगिंग केलेल्या कासवांबाबतची प्रमुख निरीक्षणे
- चारही कासव एकाच कासव समूहातील असून, त्यांचा समूह अंदाजे ४०० कासवांचा असावा.
- या समूहातील कासव अनेक वेळा अंडी घालण्यासाठी किना-यावर येतात.
- कासवांचा भ्रमणमार्ग प्रामुख्याने महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यातील समुद्रात आढळून येत आहे.