दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, मात्र त्यांना मारहाण करू नये, असा आदेश असून देखील मुलुंड पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने एका दुकानदाराच्या पुतण्याला दुकानातून बाहेर खेचून त्याला मारहाण केल्याचे सीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. दुकान मालकाने याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे लेखी अर्जातून केली आहे.
दुकानाचे शटर अर्धे उघडे होते, म्हणून…
मुलुंड पश्चिम या ठिकाणी मुकेश चौधरी यांचे भवानी फरसाण मार्ट हे दुकान आहे. रविवारी दुपारी दुकानात दुकान मालक यांचा पुतण्या प्रकाश चौधरी (२२) हा होता. दरम्यान गस्तीवर असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील हे गस्त घालत असताना त्यांना भवानी फरसाण मार्ट या दुकानाचे शटर अर्धे उघडे दिसल्यामुळे त्यांनी सोबत असलेल्या पोलिस शिपायाला दुकान बंद करण्यासाठी पाठवले. दुकानात असलेल्या प्रकाश चौधरी याने पोलिस शिपाई यांना बघून दुकान बंद करतो, असे सांगून बराच वेळ होऊनही दुकान बंद करीत नसल्याचे बघून पोलिस अधिकारी पाटील हे गस्त वाहनातून बाहेर आले व दुकानात असलेल्या प्रकाश याच्या मानगुटीला धरून दुकानाबाहेर काढले व मारहाण केली. हा सर्व प्रकार दुकानात आणि बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला, पोलिस मारहाण करीत असल्याचे हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
(हेही वाचा : धक्कादायकः महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त)
पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी!
याप्रकरणी दुकान मालक मुकेश चौधरी हे पोलिस ठाण्यात दाखल झाले असता त्याच्यावर आणि पुतण्यावर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुकेश चौधरी यांनी म्हटले आहे कि, आमच्याकडून चुकी झाली, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती, या पद्धतीने दुकानातून बाहेर काढून पोलिसांनी रस्त्यावर माझा पुतण्या प्रकाश याला मारहाण करून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिस अधिकारी सचिन पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री यांना लेखी अर्ज केला असल्याचे मुकेश चौधरी यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community