पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथे तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने आता राहुल नगर येथे मिनी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी तंबण्याची समस्या
पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, याठिकाणी १ हजार ४८० क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचे पंप बसवून पाण्याचा निचरा केला जातो. परंतु मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती आल्यास अनेकदा याठिकाणी तीन ते चार फूटांपर्यंत पाणी तुंबते. मागील वर्षीही जुलै महिन्यामध्ये दोन दिवस आणि ऑगस्टमध्ये एक दिवस ३ ते ४ फूट पाणी तुंबले होते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तासांचा अवधी लागला होता.
(हेही वाचाः मुंबई महापालिकेची विक्रमी करवसुली : ५,७९२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल)
असा होणार उपसा
त्यामुळे या भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा अभ्यास करण्यात आला असून, त्याअंतर्गत येथील पर्जन्य जलवाहिनी, ब्रिमस्टोवॅड आराखडा, पाणलोट क्षेत्र, भरती व आहोटीच्या वेळेची पाण्याची पातळी आदींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे येथे १२०० मिमी. व्यासाची रायझिंग वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी ३ हजार क्युबिक मीटर क्षमतेचे ३ पंप बसवण्यात येणार असून, या पंपांद्वारे हे पाणी वाहिनीद्वारे राहुल नगर नाल्यापर्यंत सोडले जाणार आहे.
कंत्राटदाराची नेमणूक
आयडीईएमआय एडमिन इमारत व राहुल नगर नाला कल्व्हर्ट याठिकाणी नाल्यामध्ये लोखंडी गेट बसवले जाणार आहे. याठिकाणी ३ हजार क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचे ३ पंपिंग स्टेशन, १ हजार क्युबिक मीटरचा एक पंप, ५०० क्युबिक मीटर क्षमतेचे दोन पंप यासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. या मिनी पंपिंग स्टेशनची पावसाळ्यातील कालावधीमध्ये २०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.
(हेही वाचाः महाविद्यालयांची नावे आता मराठीतच!)
इतका होणार खर्च
या कामांसाठी महापालिकेचा कार्यालयीन अंदाज हा १३ कोटी ९८ लाख रुपये होता. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने २७ टक्के अधिकची बोली लावली होती. परंतु वाटाघाटीनंतर पात्र ठरलेल्या मिशिगन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ७ टक्के दर कमी केला. त्यानंतर पुन्हा वाटाघाटी केल्यानंतर ५ टक्के दर कमी करण्याची तयारी दर्शवून हे काम महापलिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा सुमारे १५ टक्के अधिक दराने करण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे कामासाठी १६ कोटी ०७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community