मुंबईत जागरूक पालक-सुदृढ बालक’ हे विशेष अभियान गुरुवारी ९ फेब्रुवारी २०२३ पासून राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे सुमारे २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाईल. या अभियानाचे नियोजन, अंमलबजावणी व नियमित आढावा घेण्यासाठी महानगरपलिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गुरुवार ९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व आढावा घेण्याकरता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपलिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), कार्यकारी आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, भारतीय वैद्यकीय संघटनेचे सदस्य, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिले.
या अभियान अंतर्गत, मुंबई शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, दिव्यांग शाळा व अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे / बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अशा ० ते १८ वर्षापर्यंतच्या साधारण २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले आहे.
अभियान अंतर्गत ० ते १८ वयोगटाच्या बालकांना व मुला-मुलींना समुपदेशन, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटना, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ, खासगी डॉक्टर, अशासकीय संस्था यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
अभियानाची उद्दिष्टे:-
● राज्यातील १८ वर्षावरील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे.
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे.
● ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला–मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
● आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
● गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
● प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन करणे.
तपासणीचे ठिकाण:-
● शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये,
● खासगी शाळा
● अंध शाळा, दिव्यांग शाळा
● अंगणवाड्या
● खाजगी नर्सरी, बालवाड्या
● बालगृहे, बालसुधार गृहे
● अनाथ आश्रम,
● समाजकल्याण व अदिवासी विभाग वसतिगृहे (मुले / मुली),
● शाळाबाह्य (उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) मुले- मुली.
Join Our WhatsApp Community