मुंबईतील फोर्ट परिसरात पुरातन वास्तुंचे तसेच पुतळ्यांचे प्रमाण अधिक असून दमट हवामानामुळे या वास्तू तसेच पुतळे खराब होतात. त्यामुळे वास्तू तसेच पुतळ्यांची चकाकी कायम राखण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. या वास्तूंचे तसेच पुतळ्यांचे आकर्षण परदेशी पर्यटकांमध्ये अधिक असल्याने त्यांच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जात असून यासाठी संस्थेची नेमणूक केली जात आहे.
मुंबई शहर व उपनगरात अनेक पुरातन वास्तू मोठ्या प्रमाणात असून मुंबई शहरातील फोर्ट विभागात पुरातन वास्तूंचेही प्रमाण अधिक आहे. मुंबईत येणारे पर्यटक हे मुख्यतः या वास्तूंच्या कलाकुसर व बांधकामांनी आकर्षित होतात. परंतु त्या वास्तूंची योग्य देखभाल न केल्यास पर्यटक तसेच मुंबईकरांमध्ये पसरणारी नाराजी लक्षात घेता सर्वांनाच आकर्षित करणाऱ्या पुरातन वास्तूंची सातत्याने देखभाल करून त्या वास्तूंचे मुळ सौंदर्य राखण्याचा प्रयत्न महापालिका पुरातन वास्तू विभाग करत असतो. जेणेकरून पर्यटकांनी याठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यांनाही या वास्तू व पुतळे पाहून प्रसन्नता मिळेल.
या कारणामुळे खराब होतात वास्तू?
मुंबईच्या दमट हवामान व सततच्या ऊन-पावसामुळे, प्याऊ, कारंजे, तसेच पुतळ्यांवर रासायनिक प्रक्रिया होऊन दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये झाडांची रोपे वाढली जातात. कारंज्यामधील पाणी दुषित होते, ओतीव लोखंडावरील आवरण खराब होते, दिवाबत्तीमध्ये बिघाड होतो, सुरक्षेअभावी पुरातन वास्तूंचा गैरवापर होतो आदी बाबींवर उपाययोजना करण्याकरिता पुरातन वास्तूंची देखभाल केली जात आहे. त्यामुळे पुरातन वास्तूच्या बाह्य भिंतीवरील उगवणा-या वनस्पती सातत्याने काढून शास्त्रीय पध्दतीने दगडी भिंती स्वच्छ करणे, दगडी भिंतीमधील सांधे पुन्हा नव्याने चुनखडीच्या मिश्रणाने बंद करणे, हानी झालेल्या भागाची आणि नाहीशा झालेल्या सुशोभित दगडी घटकांची पुनःस्थापना करणे, पुरातन वास्तूंच्या परिसराची दैनंदिन साफसफाई करणे, पुरातन वास्तूवरील आवरणाची सहामाही परिरक्षण करणे, पुरातन वास्तूच्या परिसराच्या दिवाबत्तीची देखभाल करणे, सुरक्षा तसेच पुतळ्यांची दर तीन महिन्यांनी शास्त्रीय पद्धतीने सफाई करणे, पाण्याची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी तीन वर्षांकरता सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांकरता यावर १ कोटी ३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
(हेही वाचा : पेंग्विन पक्षी आणि कक्ष ठरतोय हाय वे कंपनीसाठी कमाईचा ‘राजमार्ग’)
पुरातन वास्तू आणि पुतळ्यांची नावे
- फ्लोरा फाऊंटन : (हुतात्मा चौक, एम.जी. रोड)
- फिट्झगेराल्ट फाऊंटन : (मेट्रो सिनेमा जंक्शन)
- देवीदास पुरुषोत्तम कोठारी प्याऊ : (जी.पी.ओ. वालचंद हिराचंद मार्ग)
- बॅन्डस्टॅन्ड : (कुपरेज गार्डन)
कांस्याचे पुतळे
- होरमसजी चावसजी दिनशॉ : (कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग/ वीर नरीमन मार्ग )
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ( मॅडम कामा मार्ग)
- जमशेठजी जीजीभॉय : (कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग/ वीर नरीमन मार्ग )
- सन दिनशॉ एडलजी वाच्छा : (महर्षी कर्वे मार्ग/ वीर नरीमन रोड)
- दादाभाई नवरोजी : (डि.,एन. रोड)
- फिरोजशहा मेहता: (महापालिका मार्ग)
- राजीव गांधी : (कुपरेज गार्डन)
- स्वामी विवेकानंद : (गेटवे ऑफ इंडीया)
- छत्रपती शिवाजी महाराज : (गेटवे ऑफ इंडीया)
- लाल बहादुर शास्त्री: (शाम प्रसाद मुखर्जी चौक)
- हुतात्मा स्मारक : (हुतात्मा चौक)
संगमरवरी पुतळे
- गोविंद रानडे : (वीर नरीमन रोड)
- सोहरबजी शापूरजी बेंगाली : (वीर नरीमन रोड)
- गोपाल कृष्णा गोखले : (वीर नरीमन रोड)
- दिनशॉ मानेकजी पेटीट : (डी. एन. रोड)