मुंबईतील फेरीवाल्यांवर प्रत्येक विभागाच्या परवाना विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येते. मात्र, ही कारवाई सुरु असली तरी विभागाच्यावतीने सुरु असलेल्या कारवाईला फेरीवाले जुमानत नाही. या कारवाईनंतर पुन्हा फेरीवाले रस्त्यांसह पदपथावर ठाण मांडून बसत आहे. त्यामुळे मध्यवर्ती अतिक्रमण विभागाच्यावतीने होणाऱ्या दक्षता पथकाच्यावतीने होणाऱ्या कारवाईचा धसका फेरीवाल्यांमध्ये असायचा. परंतु मागील काही महिन्यांपासून दक्षता पथकाच्या माध्यमातून होणारी ही कारवाई काहीशी थंडावल्याने फेरीवाल्यांवरील दहशत कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असून विभाग कार्यालयाच्या परवाना विभागाच्या या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएम स्वनिधी अंतर्गत कर्ज वाटपाची योजना राबवण्यात येत असल्याने यासाठी होणाऱ्या फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी महापालिकेची कारवाई थंडावली आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने विभाग कार्यालयाच्या वतीने होणाऱ्या फेरीवाल्यांवरील कारवाईवर अतिक्रमण विभागाच्या भरारी पथकाची नजर असायची. त्यामुळे महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने होणाऱ्या थातूरमातूर कारवाईनंतरही अतिक्रमण विभागाच्या शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांच्या परिमंडळ स्तरावरील कारवाई ही अचानकपणे वॉर्डाला कल्पना न देता केली जात असे. त्यामुळे विभाग कार्यालयाच्यावतीने फेरीवाल्यांकडून जेवढे सामान जप्त केले जात नसे तेवढे फेरीवाल्यांचे सामान परिमंडळ स्तरावरील अतिक्रमण विभागाच्यावतीने होणाऱ्या कारवाईत जप्त केले जात असे. त्यामुळे सेंट्रल विभागीय अतिक्रमण विभागाच्या कारवाईचा धसका फेरीवाल्यांकडून घेतला जात असे. परंतु मागील काही महिन्यांपासून ही परिमंडळ निहाय होणारी अतिक्रमण विभागाची कारवाईच बंद करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा पंतप्रधान मोदींचा मुंबईत मेट्रोने प्रवास; सर्वसामान्यांशी साधला संवाद)
फेरीवाले आनंदी
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण विभागाच्या भरारी पथकाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेली वाहने महापालिकेने काढून घेतली असून ही पध्दतच बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर विभाग स्तरावर होणाऱ्या कारवाईवर दक्षता ठेवण्यासाठी परिमंडळ निहाय महापालिकेच्या गाड्या पाठवून ही कारवाई केली जात असे. ही कारवाई पूर्ण पणे थांबल्याने फेरीवाले प्रचंड आनंदी आहेत.
फेरीवाल्यांना संरक्षण देण्याचा महापालिकेचा प्रयत्न
रस्त्यांवर तात्पुरती फेरीचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून आता रस्त्यांवरच विक्रीचे सामान बांधून ठेवले जाते. तसेच रस्त्यांवर चार चाकी हात गाडीवर व्यवसाय करण्यास बंदी असतानाही पुन्हा एकदा हातगाड्या दिसू लागल्या आहे. या कारवाईवर अतिक्रमण विभागाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई होणे अपेक्षित असतानाही कारवाई होत नाही. त्यामुळे एकप्रकारे फेरीवाल्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचे दिसून येत आहे. विभाग स्तरावर तसेच अतिक्रमण विभागाच्या मध्यवर्ती यंत्रणेद्वारे ही कारवाई झाल्यास फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरु शकते, असे काहींचे म्हणणे आहे.