बाळासाहेब ठाकरे स्मारकातील झाड, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तूत कोसळले

हे झाड या वास्तूला लागूनच असलेल्या स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळले. यावेळी स्मारकात काम करणारे सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावले.

72

शनिवार 17 जुलै रोजी रात्री मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले. त्याचबरोबर दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोर असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातील गुलमोहराचे झाड कोसळले. हे झाड या वास्तूला लागूनच असलेल्या स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळले. यावेळी स्मारकात काम करणारे सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावले.

गेल्या काही दिवसांपासून जुन्या महापौर बंगल्याच्या वास्तूत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. ही वास्तू स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला लागूनच आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसात बाळासाहेब ठाकरे स्मारकातील गुलमोहराचे मोठे झाड स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

smarak 1 775x420 1

स्मारकाच्या पायाभरणीचे काम सुरू

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमीपूजन सोहळा काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर स्मारकाच्या पायाभरणीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी मोठ्या पाईलिंग मशिनचा वापर केला जात आहे. या मशिनमुळे होणा-या खोदकामाने आजूबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत. यामुळे आजूबाजूच्या इमारतींना मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे झाड कोसळण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते, असे बोलले जात आहे.

युती सरकारच्या काळात स्मारकाची घोषणा

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना, 2015 साली महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळापासून हे ठिकाण जवळ असल्याने याठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च 2021 रोजी या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती.

smarak 2

महापौर बंगल्याचे स्थानांतरण

महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर भायखळा येथील जिजामाता उद्यानात महापौर बंगल्याचे स्थानांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता महापौरांचे शासकीय निवासस्थान जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.