- मंजिरी मराठे
आपली संस्कृती, आपला वारसा जतन केला जातो तो मातृभाषेमुळे. जगात अस्तित्वात असलेल्या सर्वच भाषांना संरक्षण मिळावं यासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. नुकतीच मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे तर यावर्षीचा २१ फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी विशेष आहे.
परंतु असे दिन आपण साजरे करतो म्हणजे नक्की काय करतो? आपल्या मातृभाषेला गतवैभव प्राप्त व्हावं याची एक दिवस चर्चा, एक दिवस विचारमंथन करून आपण लगेचच ते सारं विसरूनही जातो. आज आपल्या मातृभाषेची, मराठीची अवस्था काय आहे? ती वाईट झाली होतीच, पण दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालली आहे. मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी कमी का प्रयत्न झाले? पण ती मान्यता मिळाल्यानंतर मराठी भाषाशुद्धीसाठी काय प्रयत्न होताना दिसत आहेत?
आजच्या पिढीला अनेक सुंदर मराठी शब्द माहीत नाहीत, ते शब्द कसे चालतात यांचं ज्ञान नाही. अर्थात चूक त्यांची नाही कारण त्यांना उत्तम मराठी शिकवलीच जात नाही. भाषेची गोडी लागायची असेल तर शिक्षक उत्तम हवेत. पूर्वीच्या पिढ्या मराठी माध्यमातूनच शिकल्या, त्यांचं अवांतर मराठी (Marathi) वाचन असेच पण शाळेतही उत्तम इंग्रजी साहित्य अवांतर वाचनासाठी असे.
(हेही वाचा आग्र्यावरून सुटकेचा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा)
आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिकणाऱ्या मुलांचं मराठी चांगलं नसतंच पण इंग्रजीही फार बरं नसतं हे दुर्दैवी आहे. आज इंग्रजी भाषेचं ज्ञान अत्यावश्यक वाटू लागल्यामुळे आपल्या मातृभाषेकडे, मराठीकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असून मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आज मुलांना शेक्सपियरही माहीत नाही आणि पु. ल. देशपांडेही माहीत नाहीत. मुलांनी हॅरी पॉटर वाचावं की, पण चिं. वि. जोशींच्या कथा, पंचतंत्रही त्यांना माहीत असावं. लहान वयात त्यांना डोरेमॉन बघू द्यावं की, पण त्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या पात्राबरोबरच आपल्या जाज्वल्ल्य इतिहासातील छत्रपती शिवाजी राजे, संभाजी महाराज अशा अनेक खराखुऱ्या व्यक्तींच्या गोष्टी त्यांना मराठीतून सांगितल्या जाव्यात की. चिमुकले आपले पहिले बोबडे बोल बोलतात ते मातृभाषेत. तीच भाषा ऐकत प्रत्येकजण मोठा होत असतो. साहजिकच थोरा मोठ्यांकडून कानावर पडणाऱ्या मातृभाषेतूनच तुमच्याही नकळत संस्कार, संस्कृती तुमच्या मनात झिरपत असते. तुमच्या मनातल्या विचारचक्राला गती देते ती तुमची मातृभाषा. मातृभाषा उत्तम प्रकारे अवगत झाली तरच इतर भाषांवर प्रभुत्व मिळवता येतं. मातृभाषेत शिक्षण घेतलं तर ज्ञान अधिक सुलभतेनं मिळतं. आज जगात सर्वत्र मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेचं महत्व पालकांना समजणं आवश्यक आहे. इंग्रजी बरोबरच आपल्या पाल्याचं मराठी (Marathi) चांगलं कसं होईल याकडे घराघरातून लक्ष दिलं जायला हवं. बरेचदा ‘स्टाईल’ म्हणून इंग्रजी बोलण्याचा अट्टहास केला जातो. मराठीवर इंग्रजी भाषेचं गंडांतर इतकं झालं आहे की, आई, बाबा या जिव्हाळ्याच्या शब्दांची जागा मम्मी, पप्पांनी घेतली आहे. दहा शब्दांच्या एका मराठी वाक्यात पाच सात शब्द इंग्रजी असतात, असं भेसळयुक्त मराठी बोलणं टाळायला हवं.
परकीय आक्रमण हा केवळ देश स्वातंत्र्यावर घाला नसतो तर घाला असतो त्या देशाच्या भाषेवर, संस्कृतीवर. किंबहुना पहिला घाव भाषेवर घालून संस्कृती नष्ट करण्याचाच आक्रमकांचा प्रयत्न असतो. मुघलांनी तेच केलं, ब्रिटिशांनी तेच केलं.
श्री शिवछत्रपती, मोरोपंत, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, माधव ज्युलियन आणि पुढेही अनेकांनी घेतलेलं भाषाशुद्धीचं व्रत आता प्रत्येक मराठी माणसानं अंगी बाणवायला हवं. आज इंग्रजी ही उपयोगी भाषा असली तरी त्यामुळे मराठी भाषेवर तिचं आक्रमण झालं हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आपली मातृभाषा मराठी (Marathi) टिकली तरच आपली संस्कृती टिकेल आणि ती टिकवणं हे प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे. नाहीतर काय- असे कित्येक ‘दीन’ येतील आणि जातीलही.
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)
Join Our WhatsApp Community