परेल हिंदमाता आणि मडके बुवा चौकांत तुंबणाऱ्या पाण्यावर रामबाण उपाय शोधून, तेथील पाणी तिथे बांधलेल्या पिटमधून थेट दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यान आणि परेल सेंट झेवियर्स मैदानात बांधलेल्या टाकीत वळवण्यात येणार आहे. या टाकीतून हे पाणी जवळच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये वळते करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाताचे पाणी कमी करुन दादर पूर्व आणि परेलच्या नागरिकांना दिलासा देताना, दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी लोकांच्या समस्या वाढवल्या जाणार आहेत. महाजन उद्यानातून हे पाणी सेनापती बापट मार्गावरील पर्जन्य जलवाहिनीत सोडले जाणार असल्याने, या मार्गावरील सुंदर नगर, म्हात्रे पेन, कोहिनूर तसेच आसपासच्या वस्त्यांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पाणी तुंबू नये म्हणून उपाययोजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हिंदमाता, मडके बुवा चौक आदी भागात २०२०च्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ ते ४ तासांचा कालावधी लागला. समुद्रातील भरतीच्या वेळेत जर पाऊस जास्त पडला, तर अनेकदा ३ ते ४ फूट पाणी साचते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित उपाययोजना म्हणून प्रमोद महाजन उद्यानात ६० हजार घनमीटर व सेंट झेवीयर्स मैदानात ४० हजार घनमीटर क्षमतेचे पाणी साठवण्याच्या टाक्या उभारण्याचे ठरले. परंतु २०२१चा मान्सून पूर्व कालावधी विचारात घेता, या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ हजार आणि १० हजार घनमीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने एन.टी. एस. इंजिनिअरिंग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या सल्लागाराच्या अहवालानुसार हिंदमाता परिसरात ३ हजार घनमीटर प्रतितास क्षमतेचे १० पंप आणि मडके बुवा परिसरात ३ हजार घनमीटर प्रतितास क्षमतेचे ५ पंप बसवण्याची शिफारस केली आहे.
(हेही वाचाः हिंदमाता परिसरात ‘का’ नाही तुंबणार पाणी? वाचा… )
असे सोडण्यात येणार पाणी
हिंदमाता परिसरातील १० पैकी ८ पंप हिंदमाता पुलाखाली बसवण्यात आलेल्या पिटमधील पाणी उपसा करुन १२०० मीमी रायझिंग वाहिनीतून प्रमोद महाजन उद्यान टाकीत सोडण्यात येईल. दोन पंप उद्यानातील टाकीत जमा झालेले पाणी दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्ग येथील पावसाळी पाणी वाहून नेण्याऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर मडके बुवा चौक परिसरातील असणाऱ्या ५ पंपांपैकी ३ पंप वापरात असलेल्या पिटमधील पाणी उपसा करुन ९०० मीमी व्यासाच्या रायझिंग वाहिनीतून सेंट झेवीयर्स टाकीत सोडण्यासाठी, तर २ पंप हे या टाकीतून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
भाजपचा आक्षेप
हिंदमाता आणि मडके बुवा चौकातील पाणी समस्या दूर करताना परेल झेवियर्स शाळेजवळ तसेच दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर आता तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी यापूर्वीच याबाबत आक्षेप नोंदवला आहे. महाजन उद्यान आणि सेंट झेवियर्समधील पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम निविदा न काढता तुकड्या तुकड्यांमधून विभागून देण्यात आले. पण हे काम केल्यानंतर हिंदमातामधील पाणी समस्या दूर होईल, पण दादर पश्चिम सेनापती बापट मार्गावरील हे पाणी तुंबले जाण्याची दाट शक्यता आहे, अशीही भीती शिरसाट यांनी व्यक्त केली.
(हेही वाचाः …तर मुंबईत होऊ शकते पाणी कपात! धरणांमध्ये इतकाच साठा शिल्लक)
Join Our WhatsApp Community