चारकोप ७ मधील पाणी समस्या सुटणार

चारकोप सेक्टर-८ मधील ६ इंचाची जलवाहिनी मागील २ वर्षापूर्वी बदलण्यात आलेली आहे. तर आता सेक्टर ०७ मधील जलवाहिन्या बदलण्याचा कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याबाबतच्या कामासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे ही कामे बांधकाम विभागामार्फत ताबडतोब काम सुरु करण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली आहे. शिवसेना नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी विभागातील उपस्थित केलेल्या पाणी समस्येवर बोलतांना वेलारासु यांनी हे स्पष्ट केले.

स्थायी समितीच्या बैठकीत पाणी समस्येच्या विषयावरील चर्चेत भाग घेताना चारकोप मधील शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी, माझ्या विभागामध्ये १५-२० दिवस झाले पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार मांडली होती.मला लोकांकडून जो मेसेज येतो तो मी जसाच्या तसा संबधीत जल अभियंता विभागातील अधिका-यांना पाठविते. हे अधिकारी केवळ हे मेसेज वाचण्याची कामे करीत आहे. पण त्यावर कधीही ते प्रतिक्रिया देत नाही. माझ्या विभागामध्ये म्हाडा वसाहत असल्यामुळे त्याच्या पाईपलाईन या १५ ते ३० वर्षे जुन्या आहेत. त्या बदलण्याबाबत मी २००७ पासून वारंवार प्रयत्न करीत आहे. पाण्याचे जे व्हॉल आहेत ते २५-३० वर्षे जुनी आहेत ते गंजले आहेत. या पाइप लाईनमध्ये जे तुकडे अडकतात. त्यामुळे पाण्याच्या पुरवठा व्यवस्थित होत नाही. यावर कायम स्वरूपी तोडगा काढला जात नाही. यावर उपाय म्हणून त्याठिकाणी पाईपलाईन १० – १० फुटांवर किंवा ५०- फुटांवर ब्रेक करण्यात यावी आणि त्याठिकाणी एक मोठा पाईप बसवण्यात यावा, जेणेकरुन पाईप लाईनमध्ये तुकडे अडकणार नाहीत, अशी सूचना दोशी यांनी केली होती.

जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव समितीत मंजूर

यावर स्पष्टीकरण देताना पी. वेलारासु यांनी,चारकोप परिसर हा सेक्टर १ ते ९ असा असून या परिसराला महावीर नगर येथील जलबोगद्यातून दुपारी ११.४५ ते २.०५ या वेळेत पाणीपुरवठा होतो. सेक्टर-८ मधील इवाची जलवाहिनी मागील २ वर्षापूर्वी बदलण्यात आलेली होती. सेक्टर ०७ मधील जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झालेला आहे. ही कामे बांधकाम विभाग याचे मार्फत ताबडतोब काम सुरु करण्यात येतील. चारकोप व गोराई विभागात जलवाहिन्यांना सिमेंटचा गिलावा आतील बाजूस केला असल्याने सध्या तरी बदलण्याची आवश्यकता वाटत नाही. तरी सुध्दा गरज वाटल्यास एखादया ठिकाणी पहाणी करून बदलण्यात येईल, असेही त्यानी स्पष्ट केले.

(हेही वाचा – पगाराच्या आंदोलनात ‘नोकरी’ही गेली; राज्यात ‘या’ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित)

जलवाहिन्यामध्ये सिमेंटचे तुकडे अडकतात. त्याकरीता जलवाहिन्यामध्ये खड्डे घेऊन तसे चेंबर बनविण्यात येतील. त्याकरीता नियोजन व संशोधन विभागाकडून चर्चा करुन मंजूरी घेण्यात येईल. ज्या ठिकाणी महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो, त्या सोसायटीने खाजगी टँकर उपलब्ध करून दिल्यास टिळक रोड या ठिकाणी भरुन देण्यात येईल व महापालिकेचा टँकर उपलब्ध झाल्यास किवा इतर ठिकाणी आवश्यक असल्यास पुरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here