दिवाळी आणि त्यानंतरचे चार महिने हाच काळ मागील वर्षी अवघ्या भारतासाठी ‘काळ’ ठरला होता. ‘कोरोना संपला’, अशा अविर्भावात भारतीय बिनधास्त दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जमले, नातेवाईकांना भेटले, काहींच्या लग्नाच्या बैठकाही पार पडल्या, ४ महिने लग्न कार्यात मजेत घालवली. त्यानंतर भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अवघ्या जगाने पाहिला. यंदाच्या वर्षीही तोच काळ पुन्हा आला आहे, ही भारतीयांसाठी धोक्याची घंटा आहे.
लसवंतही डेल्टाचे प्रसारक!
मागील वर्षी याच कालावधीत कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गर्दी जमली, सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि काही ठिकाणी छोट्या जत्राही पार पडल्या. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विळखा घातला आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा तिप्पट वेगाने दुसरी लाट आली. आज जरी लसीकरण बऱ्यापैकी झाले तरी लसवंत असलेले लोकही लस न घेतलेल्या लोकांइतकाच कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार करू शकतात, असे यासंदर्भात ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आले आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे. या लसी डेल्टा विषाणूवर कमी परिणामकारक आहेत, असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा संसर्ग घरातील व्यक्तींपासून सर्वांत जास्त प्रमाणात होतो, असेही दिसून आले आहे.
(हेही वाचा : शिवसेना भवनासमोरच सेना-मनसेमध्ये कंदिल ‘वॉर’)
सहा राज्यांत नव्या व्हेरियंटची एन्ट्री
अमेरिका, ब्रिटन, रशियात कोरोनाच्या AY.४ – डेल्टा व्हेरियंट या नव्या व्हेरियंटने थैमान घातले आहे. तोच नवा व्हेरियंट भारतातील सहा राज्यांत सापडला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
लग्न कार्यात उत्साहाला आवर घाला
मागील दीड वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणि निर्बंधाचा कालावधी यामुळे अनेक विवाह सोहळे रखडली होती, त्यांचे मार्ग मोकळे झाले आहेत. दिवाळीनंतर लागलीच विवाहाचे मुहूर्त सुरु होत आहेत. राज्यातील सर्वच ठिकाणी मंगल कार्यालये आरक्षित झाली आहेत. सध्या मंगल कार्यालये, लॉन्स, पार्टी हॉल या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटीची कामे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नात लागणारे केटर्स, मंडप व्यावसायिक, भटजी, बँड, सनई -चौघडा, सजावटकार यांचीही लगबग सुरू झाली आहे. दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात तुळशीविवाह झाल्यानंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. अशा सर्व परिस्थितीत यंदाच्या वर्षी या काळात राज्यभर धामधूम सुरु असणार आहे, असा वेळी ‘कोरोना अजून गेला नाही’, याचे विस्मरण होऊ न देणे महाराष्ट्रासह देशाला फायद्याचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community