- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटचे काम करण्यासाठी मागील वर्षी मोठ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कंत्राटदारांकडून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात येत असले तरी या मोठ्या कंत्राटदारांकडून केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. बोरीवली पश्चिम येथील चिकूवाडीतील रस्त्यांचे काम अवघ्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले असून त्यातील काही भागांमध्ये रस्ता पहिल्याच किरकोळ पावसात वाहून गेला आहे, काही भागांमध्ये रस्ता चक्क उखडला गेला असल्याचे दिसून येत आहे. (Chikuwadi)
मुंबईतील सर्व रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मागील वर्षी सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा काढून कंत्राटदारांची निवड केली. तब्बल साडेसहा हजार कोटींच्या या कामांसाठी शहर, पूर्व उपनगरे प्रत्येकी एक आणि पश्चिम उपनगरासाठी तीन भागांमध्ये विभागून तीन परिमंडळांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अशाप्रकारे एकूण पाच कंत्राटदारांची निवड केली. त्यातील शहर भागातील कंत्राटदाराने वेळेवर काम न केल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ६४ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. (Chikuwadi)
मात्र, पहिल्या टप्प्यात नेमलेल्या कंत्राटदारांकडून दोन वर्षांमध्ये ही कामे केली जातील असा दावा महापालिका आयुक्तांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याअंतर्गत महापालिकेच्या परिमंडळ सातमधील आर मध्य, मध्य उत्तर आणि आर दक्षिण विभागासाठी एक स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये आर मध्य विभागातील चिकू वाडी येथील रस्त्यांचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले असून पहिल्याच पावसात या रस्त्यावरील काही भागांमधील खडीच वाहून जात तो भाग खराब झाला आहे. (Chikuwadi)
(हेही वाचा – वर्षभरात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करा; Vanchit Bahujan Aghadi ची मागणी)
चिकूवाडीतील सोनीपार्क सी व डी विंगसमोरील व विनस इमारतीच्या प्रवेशमार्गासमोरील तसेच शिवसेना शाखेसमोरील भाग खराब होऊन त्यावरील खडी वाहून गेल्याचे दिसून येत आहे. तसेच सोनी पार्क इमारतीच्या ए व बी विंगच्या प्रवेशद्वारासमोरील जोडणाऱ्या मार्गावरच काँक्रिट उखडून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. दोन सांध्याच्या जोडणीच्या परिसरातच हा खड्डा निर्माण झाला असून अवजड वाहनांमुळे हा भाग खचला गेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता खचून खड्डा पडणे आणि पहिल्याच किरकोळ पावसात खडी वाहून जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांकडूनही चिंता तसेच आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. (Chikuwadi)
तसेच कांती पार्क रोडला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे कामही नव्याने करण्यात आले असून या रस्त्याचेही खेळाच्या मैदानासमोरील बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यांवरही खडी पहिल्याच पावसात वाहून जावू लागली आहे. तसेच यासह जोडणाऱ्या दोन्ही नव्याने बनवलेल्या रस्त्यांवर झाडांच्या मुळाच्या बाजुने जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने या रस्त्यांची कामे केल्यानंतरही पहिल्याच पावसांमध्ये ते बांधकाम वाहून जावून रस्ता खडबडीत बनल्याने या रस्त्यांच्या बांधकामाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहे. (Chikuwadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community