चांदिवली येथील ९० फूट रस्त्याच्या कामाला मुंबई महापालिकेच्या वतीने लवकरच सुरूवात होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदिवली येथून पवईला जाणाऱ्या खैरानी मार्गापर्यंतची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून यावरील बाधित बांधकामे हटवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
चांदिवली येथील प्रस्तावित ९० फूट रस्ता (डीपी रोड) हा चांदिवली फार्म मार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी मार्ग यांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम सुरु करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या प्रस्तावित रस्त्याची माहिती घेऊन रस्ते आणि वाहतूक विभागाला तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या. त्यानुसार रस्ते आणि वाहतूक विभागाकडून या कामासाठीच्या जागेची मोजणी करून आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -(BJP vs Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाला भाजपचा दे धक्का…!)
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. चांदिवलीतील प्रस्तावित डीपी रस्ता होणाऱ्या जागेवरील सुमारे ८० ते ९० बांधकामे बाधित होणार आहेत. या रस्त्याच्या बाजूच्या खासगी आणि रस्ता होणाऱ्या जागेवरील बाधित बांधकामे हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून ८१५ नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (केंद्र सरकार) यांच्याकडून चांदिवलीतील जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर आणि या जागेवरील बाधित बांधकामे हटविल्यानंतर प्रस्तावित रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. ही जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रियाही जलद गतीने सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.
चांदिवलीतील या ९० फूट प्रस्तावित रस्त्याची लांबी ८०० मीटर तर रुंदी २७ मीटर असेल. या रस्त्यामुळे चांदिवली विभागातील नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे. हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहार येथील जागेवरील आणि दुसऱ्या टप्प्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मालकी असलेल्या जागेवरील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. चांदिवली फार्म आणि डीपी या दोन मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे एल आणि एस विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असा विश्वास उप प्रमुख अभियंता (रस्ते) संजय सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community