मुंबई महापालिकेच्या पदवीधारक आणि पदविकाधारक अभियंत्यांच्या पदोन्नतीकरता आखलेल्या ६७:३३ या सुत्रानुसारच पदोन्नती तात्काळ करण्याची मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत सध्या घेतलेल्या निर्णयामुळे यादीतील फक्त २४ पदवीकाधारक दुय्यम अभियंत्यांवरच (स्थापत्य) नव्हे तर एकंदर २२०० पदवीकाधारक अभियंत्यावरती याचे दुष्परिणाम होणार असल्याची भीतीही त्यांनी वर्तवली आहे.
२२०० पदवीकाधारक अभियंत्यावर याचे दुष्परिणाम होणार
म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनामध्ये पदवी धारक व पदविका धारक अभियंत्यांच्या बाबतीत ६७:३३ सुत्र आमच्या संघटनेनी केलेल्या विविध न्यायालयीन लढाईनंतर ठरविण्यात आले आहे. सुत्र ठरविण्या आधी आम्ही आमचे सर्व न्यायालयीन दावे मागे घेतले होते. पण आपण घेतलेल्या पदवीधर ८५ टक्के आणि पदविका धारक १५ टक्के या नव्या निर्णयामुळे सेवाजेष्ठ पदविकाधारक दुय्यम अभियंते यांना पदोन्नतीपासून वंचित केले जात आहे. आपण घेतलेल्या निर्णयामुळे यादीतील फक्त २४ पदवीकाधारक दुय्यम अभियंत्यांवर (स्थापत्य) नव्हे तर एकंदर २२०० पदवीकाधारक अभियंत्यावर याचे दुष्परिणाम होणार आहेत. तसेच कार्यकारी अभियंता ते उपायुक्त, अभियांत्रीकी इत्यादी पदांच्या सुमारे ९० ते १०० पदवीधर अभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागा शीघ्र गतीने भरल्यास पदवीधर दुय्यम अभियंत्यांचा पदोन्नतीचा मार्ग सुकर होईल,असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
( हेही वाचा : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन)
प्रशासनाच्या निर्णयामुळे संबंध पदवीकाधारक अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या दैनंदिन कारभारावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,अशी भीती व्यक्त करत त्यांनी आपण दिलेल्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करून ६७ : ३३ ह्या सुत्राप्रमाणे सेवाजेष्ठ पदवीका धारक यांना ३३ टक्के व सेवाजेष्ठ पदवी धारक यांना ६७ टक्के कोटा असा पूर्वीप्रमाणे आजतागायत देण्यात येणाऱ्या पदोन्नतीचे धोरण राबवावे. जेणेकरून १० ते १५ वर्ष कनिष्ठ अभियंता म्हणुन सेवा देणाऱ्या व सुमारे १० वर्ष सेवा देणाऱ्या दुय्यम अभियंता यांच्यावर होत असलेला अन्याय दूर होईल,असे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community