लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. जेव्हा मृत्यूदर वाढतो, रुग्णालयांमध्ये जागा उरत नाही, रुग्ण संख्या वाढत जात असते, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, अशी जेव्हा परिस्थिती होते, तेव्हाच लॉकडाऊन लावला जातो, तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झालेली नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कडक निर्बंध लावले!
राज्यात ज्या ज्या भागात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, त्या भागांमध्ये आम्ही लॉकडाऊन लावत आहे. बाकी ठिकाणी निर्बंध कडक करत आहोत. नाईट कर्फ्यू लावत आहोत. राज्यात आम्ही जनतेमध्ये प्रबोधन करत आहोत, त्यांना विनंती करत आहोत, तसेच दंडात्मक कारवाई देखील करत आहोत. एकट्या पुण्यात मागील ५ दिवसांत मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून २० लाख रुपये वसूल केले आहेत, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
हाफकिनमध्ये लस उत्पादन करण्याबाबत प्रस्ताव!
दरम्यान देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची गरज आहे. त्यासाठी केंद्राला आम्ही भारत बायोटेक लसीचे तंत्रज्ञान हाफकिनला देण्यात यावे, हाफकिनची २२ कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे. त्यातील २५ टक्के डोस महाराष्ट्रात वापरले जातील, असा प्रस्ताव केंद्रासमोर मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सर्व राज्यांना आवाहन केले आहे. अशा प्रकारे कोरोना लसनिर्मिती करण्याची व्यवस्था ज्या राज्यांची असेल त्यांनी तसे कळवावे, आम्ही त्यांना भारत बायोटेक लसीचे तंत्रज्ञान देवू, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू आहे का?
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू पसरला आहे का, याविषयी अद्याप केंद्रीय यंत्रणेने स्पष्ट केले नाही. आम्ही चाचणीसाठी केंद्राकडे नमुने पाठवले आहेत. केंद्रीय यंत्रणेने अद्याप तसे कळवले नाही, जर केंद्रीय यंत्रणा राज्यात नवा कोरोनाचा विषाणू पसरला आहे, असे सांगेल तेव्हा त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नरत होऊ, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
(हेही वाचा : कर्नाटकात पहाटेचे अजान ऐकूच येणार नाही!)
राज्यात कोरोना लसीचा तुटवडा!
राज्यात कोरोना लसीचा तुटवडा आहे, हे आम्ही म्हणालो यामागे कारण आहे. आधी प्रत्येक दिवशी २५ हजार, ३५ हजार जणांना लसीकरण करत होतो. आता हे प्रमाण वाढले असून दिवसाला ३ लाख जणांचे लसीकरण करत आहोत. त्यामुळे एका आठवड्यातच उपलब्ध लसींचा डोस संपेल. कारण राज्याकडे ३० लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. म्हणून केंद्राकडे लसींची मागणी करण्यात आली आहे, असेही टोपे म्हणाले.
आरोग्य विभागाच्या ४ कॅडरच्या परीक्षांचे निकाल रोखले!
काही तांत्रिक कारणामुळे आरोग्य विभागातील ४ कॅडरच्या परीक्षांचे निकाल रोखून धरले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे हे निकाल रोखले आहेत. नर्सिंग, आरोग्यसेवक असे ते कॅडर आहेत. त्यासंबंधी आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, त्या समस्यांचे निवारण केले आहे. त्यामुळे अन्य ५० कॅडरच्या परीक्षांचे निकाल येत्या दोन दिवसांत जाहीर होतील, असेही टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून! – केंद्रीय मंत्री जावडेकर
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. मात्र राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे. महाराष्ट्रात 12 मार्चपर्यंत 52 लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचे दिसत आहे, असे जावडेकर म्हणाले. .
Join Our WhatsApp Community