बाहेरगावी जाणा-यांना कोणतेही पास नाही… पोलिस महासंचालकांच्या स्पष्ट सूचना!

नागरिकांनी योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. जाणे आवश्यक असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे अथवा ओळखपत्रे सोबत ठेवावी, असे देखील पांडे यांनी म्हटले आहे.

संचारबंदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांना यंदा कुठल्याही प्रकारचे पास वाटप करण्यात येणार नसल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नागरिकांनी योग्य कारणाशिवाय बाहेर पडू नये, योग्य कामासाठी बाहेर पडताना ओळखपत्र अथवा योग्य कारण असल्याचा पुरावा घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी केले आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे. काही समस्या असेल तर नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पांडे यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.

विनाकारण बाहेर पडणा-यांवर कडक कारवाई

राज्यात बुधवारी रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील पोलिस दोन शिफ्टमध्ये रस्त्यावर असतील, त्यात १३ हजार २८० गृहरक्षक दल (होमगार्ड) आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या २२ तुकड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. या १५ दिवसांच्या कडक निर्बंधांच्या काळात पोलिसांकडून कुठल्याही प्रकारच्या पासेसचे वाटप करण्यात येणार नसल्याचे त्यांनी आपल्या सूचनेत म्हटले आहे. नागरिकांनी योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. जाणे आवश्यक असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे अथवा ओळखपत्रे सोबत ठेवावी, असे देखील पांडे यांनी म्हटले आहे. महापालिका, ग्रामपंचायत यांच्या कारवाईत पोलिसांनी सहकार्य करावे, तसेच साथीच्या रोगाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसुलीचा पोलिसांना अधिकार देण्यात आला असल्याचे, पांडे यांनी आपल्या सूचनेत म्हटले आहे.

(हेही वाचाः सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांचे एकच उत्तर ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’!)

वर्षभरात किती दंड व गुन्हे दाखल

मुंबई शहर वगळता राज्यात मार्च २०२० ते १४ एप्रिल २०२१ या दरम्यान दंडाच्या रुपात ९० कोटी ४७ लाख ५८ हजार १९२ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मुंबई वगळता राज्यभरात ३ लाख २३ हजार ४९२ गुन्हे दाखल करण्यात आले. ४७ हजार ३०२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एकूण १ लाख १ हजारे ३३८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोविड संदर्भात १०० नंबर वर १ लाख १५ हजार ८४५ कॉल घेण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवर अफवा पसरवणे, खोटी माहिती पसरवणे या संदर्भात ८४८ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मुंबई पोलिस वगळता राज्यात ३६ हजार ७२८ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून, ३७३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ३०४ पोलिस कॉरंटाईन झाले होते. मुंबई वगळता राज्यातील ८१ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस ४० टक्के पोलिसांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here