सध्या राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णांची वाढणारी आकडेवारी ही राज्य सरकारसाठी चिंतेची बाब असून, औरंगाबाद मध्ये अंशतः लॉकडाऊनची सुरुवात झालेली आहे. तर तिथेच मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारे रुग्ण संख्या वाढत राहिली तर मुंबईमध्येही अंशतः लॉकडाऊन करावे लागेल. अशी शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी वर्तवली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील जिल्हाधिकारी तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंबंधी चर्चा केली. जिथे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तिथे निर्णय घेण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला जनतेकडून प्रतिसाद नाही
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं होतं. कोरोनाचे सर्व नियम जनतेने काटेकोरपणे पाळले तर राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा कुठेतरी थांबवता येईल. मात्र सध्या ज्याप्रमाणे आकडेवारी वाढत आहे त्यानुसार जनतेने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यात काही भागांमध्ये रुग्ण संख्या कमी होत असली, तरी अनेक भागांमध्ये रुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.
(हेही वाचाः अधिवेशनाच्या अखेरीस विधानसभा अध्यक्षाची निवड? काँग्रेसपुढे सेना, राष्ट्रवादी झुकली? )
नाईट क्लब आणि पर्यटन स्थळे बंद?
यासोबतच मुंबईमध्ये लोकांची अनावश्यक गर्दी वाढत आहे. मुंबईमधील पर्यटन स्थळावर गर्दी अधिक प्रमाणात असलेली पाहायला मिळते. त्यामुळे सगळ्यात आधी मुंबई मधील पर्यटन स्थळं बंद करणे गरजेचे आहे. तसेच मुंबईतील नाईट क्लबमध्ये गर्दी होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नाईट क्लबवर देखील बंदी घातली जाऊ शकते, असा इशारा असलम शेख यांनी दिला.