राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी राज्य सरकार या निर्णयाचा विचार करत आहे.

95

राज्यात कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा ५० हजाराच्या वर जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करण्यास सुरुवात करुन चार दिवस झाले आहेत. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आता तीन आठवड्यांचा कडकडीत लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याचे, काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे, विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकलवरही निर्बंध येणार?

लोकलमधील गर्दी हे देखील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. यावरून आता राज्य सरकार पुन्हा लोकलवर निर्बंध घालावे का? याचा विचार करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, लोकल पूर्ण बंद करावी किंवा लोकल सेवेवर निर्बंध आणावेत, यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. असे विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सांगितले होते.

(हेही वाचाः आता लोकलवर निर्बंध?)

राजकारण करू नका

पुढील 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करू नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथवले जात आहे. त्यामुळे हे राजकारण थांबवा असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.