आता कितीही वेळा देता येईल MPSC परीक्षा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देण्यासाठी आता कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा MPSC कडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणे निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधित घोषणा १५ जून रोजी करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

( हेही वाचा : एकाच दिवसात राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा विक्रम)

उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही

एमपीएससीकडून विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची MPSC कडून नियुक्ती केली जाते. मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून MPSC ने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे MPSC ने स्पष्ट केले होते. मात्र या निर्णयाला विरोध झाला होता. म्हणूनच MPSC ने या निर्णयात आता फेरबदल करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here