आता हल्लेखोर वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’

गडचिरोलीतील देसाईगंज येथील उसेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका माणसाचा सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी साडेआठच्या  सुमारास जंगलात गेलेल्या दोन इसमांपैकी एकावर वाघाने हल्ला केला. ‘सीटी१’ असे या हल्लेखोर वाघाचे नाव असून, आतापर्यंत या वाघाने अकरा जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंतचे सर्व हल्ले वाघाने जंगलात गेलेल्या माणसांवर केले आहे. मात्र वाढत्या हल्ल्यांमुळे गेले कित्येक महिने वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पळणा-या ‘सीटी१’ या वाघाला अखेर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने पकडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ‘सीटी१’ वाघाला पकडण्याचे वनविभागासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

कशा प्रकारे वाघाने केले हल्ले

गेल्या आठवड्याभरापासून सीटी१ गडचिरोलीतील वडसा येथील देसाईगंज येथे दिसून येत होता. ऐन गणेशोत्सव काळात सीटी१चा वावर असल्याने वनविभागाने भल्या पहाटेही मानवी वस्तीजवळ जनजागृती सुरु केली होती. लोकांना रात्री तसेच पहाटे जंगलात जाण्यास मज्जाव केला होता. मात्र घरच्यांना वळसाच्या मुख्य बाजारात जायचे असल्याचे सांगत वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेले प्रेमपाल प्रधान (४५) आपल्या मित्रासह दुचाकीवरुन सकाळी गावाबाहेर निघाले. जंगलाजवळ दुचाकी लावून दोघेही जंगलात पीक तोडणीसाठी गेले असता ‘सीटी१’ ने एकावर हल्ला केला.  या हल्ल्यात प्रेमपाल यांचा मृत्यू झाला. दोघांनीही वनविभागाने नजीकच्या गणेशोत्सव मंडळात वनविभागाने केलेली जनजागृतीही ऐकली होती. त्यामुळे वाघाचा वावर असल्याचे माहित असूनही प्रेमपाल आणि त्यांच्या मित्राने जंगलात जाण्याचे कृत्य केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा मध्य प्रदेशात लव्ह जिहाद घडवण्याचा प्रयत्न, मुलीने विरोध करताच ऍसिड हल्ल्याची धमकी )

पुण्यातील रेस्क्यू संस्थेने दिला थर्मल ड्रोन

गडचिरोलीत गेल्या महिन्याभरापासून २३ हत्तींचा वावर सुरु आहे. हत्तींना त्रास होऊ नये म्हणून वनाधिकारी थर्मल ड्रोनच्या साहाय्याने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आता या थर्मल ड्रोनच्या मदतीने वाघ पकडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडून दिला गेलेला थर्मल ड्रोन काही नियोजित तासांसाठी सीटी१साठी वापरला जाईल. बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी पहाटे पहिल्यांदा ‘सीटी१’ ला शोधण्यासाठी थर्मल ड्रोन वापरला गेला. गुरुवारी सकाळी वाघाचा हल्ला झाल्याचे समजल्यानंतर दिवसभर थर्मल ड्रोन वाघाच्या शोधासाठी वापरला गेला. परंतु वाघ नजीकच्या परिसरात दिसून आला नाही. वाघ कदाचित झुडूपात लपून बसला असावा, अशी माहिती गडचिरोली वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक धनंजय वायभसे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here