या विदेशी व्हॅक्सिन लवकरच येणार भारतात… काय आहे त्यांची किंमत? किती आहेत प्रभावी? वाचा…

या लसींच्या किंमती आणि त्यांच्या प्रभावीपणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

भारतात कोरोनाची परिस्थितीत पुन्हा एकदा बिकट होत चालली आहे. जवळपास हद्दपार होत आलेला कोरोना भारताच्या वेशीवरुन परत फिरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता आपल्याकडे लस हे एकमेव शस्त्र आहे. भारतात बनत असलेल्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा पुरवठा आता कमी पडत चालला आहे. त्यामुळे या लसींसोबतच आता भारताने विदेशात तयार केल्या जाणा-या काही लसींना तात्काळ मान्यता दिली आहे. यामध्येच रशियन वॅक्सिन स्पूतनिक सोबतच इतरही काही देशांतील लसींचा समावेश आहे. या लसींच्या किंमती आणि त्यांच्या प्रभावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

या आहेत विदेशी व्हॅक्सिन

मॉडर्ना

 • मॉडर्ना या अमेरिकन कंपनीने एनआरएनए तंत्राचा वापर करुन ही लस तयार केली आहे.
 • या लसीचा प्रभाव हा 94.1 टक्के इतका आहे.
 • या लसीच्या दोन डोसमधील अंतर हे 28 दिवस असणे गरजेचे आहे.
 • 30 दिवसांसाठी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तर, 0 ते -20 डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकते.
 • या लसीच्या एका डोसची किंमत साधारण 1125 ते 2475 रुपये इतकी आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या! राज ठाकरेंची मोदींकडे मागणी)

फायझर-बायोएनटेक

 • ही लस कोविड-१९ व्हायरसच्या जनुकीय पदार्थांपासून तयार करण्यात आली आहे.
 • साधारणपणे तीन आठवड्यांच्या फरकाने या लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे.
 • ही लस 94 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
 • या लसीची साठवणूक करण्यासाठी प्रभावी यंत्रणेची गरज आहे.
 • साठा करण्यासाठी या लसीला 0 ते -80 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे.
 • या लसीच्या एका डोससाठी 500 ते 1800 रुपये किंमत मोजावी लागणार आहे.

जॉन्सन अॅंड जॉन्सन

 • या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे या लसीची केवळ एकच मात्रा(डोस) दिली जाते.
 • 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात तीन महिने तर 0 ते -20 डिग्री सेल्सिअस तापमानात २ वर्षांपर्यंत ही लस साठवून ठेवता येऊ शकते.
 • या लसीचा प्रभाव इतर लसींच्या तुलनेत थोडा कमी आहे.
 • जगात 66 टक्के तर अमेरिकेत 72 टक्क्यांपर्यंत ही लस प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
 • लसीच्या एका डोससाठी 650 ते 750 रुपये मोजावे लागू शकतात.

(हेही वाचाः महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण कमी! केंद्राची पुन्हा नाराजी )

नोवावॅक्स

 • या लसीचे मानवी शरीरावर परीक्षण होत आहे.
 • ब्रिटनमध्ये झालेल्या परीक्षणात ही लस 89.3 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
 • ही लस इतर लसींच्या तुलनेत थोडी स्वस्त असल्याचे समजते.
 • या लसीच्या एका डोसची किंमत 225 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here