मुंबई महानगरात पर्जन्य जलवाहिन्या, मलवाहिन्यांवर असणारे झाकण चोरुन नेल्याचे प्रकार अधूनमधून निदर्शनास येतात. अशाच प्रकारच्या घटनेत, विलेपार्लेमध्ये भल्या पहाटे पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरुन नेण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न एका खासगी सोसायटीच्या सतर्क सुरक्षा रक्षकाने हाणून पाडला. या सुरक्षारक्षकाला आपल्या कार्यालयात निमंत्रित करुन के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी त्यांचा सत्कार केला.
( हेही वाचा : उद्धव ठाकरे शिवसेनेचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज : पक्षाची प्रतिनिधी सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी)
के-पश्चिम विभागातील विलेपार्ले (पश्चिम) परिसरात दर्शन सोसायटी, १६ फ्रेंडस को-ऑप हौसिंग सोसायटी, एन.एस. मार्ग क्रमांक ६, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू याठिकाणी रविवार ८ जानेवारी २०२३ रोजी भल्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात २ चोरटे एका रिक्षातून चालकासह आले. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरी करण्याचा ते प्रयत्न करत असतानाच आवाज ऐकून सोसायटीचे सुरक्षा रक्षक प्रकाश झाला धावत बाहेर आले. प्रकाश येत असल्याचे पाहताच चोरट्यांनी रिक्षातून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याआधारे महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्रकाश झाला यांच्या सतर्कतेमुळे पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरी जाण्याचा प्रकार टळला. परिणामी, भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळली आहे. या सतर्कतेबद्दल कौतुक म्हणून के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी प्रकाश यांना आपल्या कार्यालयात बुधवारी निमंत्रित करुन त्यांचा सत्कार केला. कर्तव्यदक्ष व सतर्क नागरिकांच्या सहभागाने महानगरपालिकेच्या कामकाजाला प्रोत्साहन मिळते, अशा शब्दात सहायक आयुक्तांनी गौरव केला. पर्जन्य जलवाहिनीचे झाकण व तत्सम वस्तू चोरीला गेल्याने महानगरपालिकेचे नुकसान तर होतेच, पण अपघातांना व दुर्घटनांनाही निमंत्रण मिळते व त्यातून अकारण महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रकाश झाला यांची सतर्कता निश्चितच वाखाणण्यासारखी आहे,असे चौहान यांनी म्हटले आहे.