तिसरे अपत्य: १७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेतील नोकरीचे दरवाजे बंद!

195

कोविड काळात मुंबई महापालिकेचे तब्बल २५४ कर्मचारी मृत पावले असून या मृत व्यक्तीला तिसरे अपत्य असल्याने त्यांच्या नातेवाईकांना नोकरीच्या सेवेपासून वंचित राहावे लागले आहे. तब्बल १७ मृत कामगार, कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य असल्याने या प्रकरणात महापालिकेला कोणताही निर्णय घेता येत नसल्याने या मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या नोकरीचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे कोविड काळाकरता महापालिका राज्य शासनाशी पत्रव्यवहार करून या १७ प्रकरणांमध्ये विशेष बाब म्हणून न्याय देत त्यांचे अश्रू पुसतात की त्यांच्या नोकरीचा अधिकार संपुष्टात आणतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वारसांना सामावून घेण्याचा निर्णय

मुंबईमध्ये मार्च २०२० कोविडच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आजमितीस विविध विभागांमध्ये डॉक्टर, नर्सेस, महापालिकेचे अधिकारी, कामगार, कर्मचारी अशाप्रकारे एकूण २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व महापालिका सेवेत त्यांच्या वारसांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकषांमध्ये महापालिकेचे कर्मचारी बसत नसल्याने यासर्व मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सेवेत सामावून घेताना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिका प्रशासनाच्यावतीने केली जात आहे.

( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ १२ केंद्रांवर होणार ‘१२ ते १४’ वयोगटातील मुलांचे लसीकरण! )

तिसरे अपत्य असल्याने १७ प्रकरणांमध्ये नोकरीचा निर्णय घेतला नाही

त्यानुसार महापालिका सेवांमध्ये मृतांच्या वारसांना सामावून घेण्याची प्रक्रिया राबवली जात असून आजवर मृत पावलेल्या २५४ कामगारांपैंकी १२२ प्रकरणे मंजूर झाल्याने त्यांच्या वारसांना सामावून घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. तर ६३ प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुरु असल्याची आकडेवारी मिळत आहे. तर वारसा वादामुळेच १४ मृत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर वारस सज्ञान नसल्याने ०८ प्रकरणांमध्ये दावा राखून ठेवला आहे. तर तिसरे अपत्य असल्याने १७ प्रकरणांमध्ये नोकरीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ३१ डिसेंबर २००१ रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास त्यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेता येत नाही. त्यामुळे १७ मृत कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य हे ३१ डिसेंबर २००१नंतरचे असल्याने त्यांच्या वारसांना नियमानुसार सरकारी सेवांमध्ये सामावून घेतले जावू शकत नाही,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ३० कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नोकरीसाठी अर्जच केला नसल्याचीही माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.