शरीरात अनेक फ्रॅक्चर असलेल्या बिबट्याच्या बछड्यांबाबत आली मोठी बातमी

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कायमस्वरुपी घर मिळालेल्या अनाथालयातील तीन बिबट्यांनी दोन महिन्याभराच्या आतच चालणे बंद केले होते. तिन्ही बिबट्यांचे बछडे दररोज वैद्यकीय तपासणीला मुकल्याने अखेर उद्यान प्रशासनाला त्यांना पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे सोपवण्याची नामुष्की ओढावली. गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या तिन्ही बिबट्यांच्या बछड्यांना वाचवणे अवघड होऊन बसले. परिणामी, दोन मादी बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अनाथालयात बछडे

तिस-या बछड्याला नवे जीवनदान देण्यात रेस्क्यू या संस्थेला यश आले आहे. उद्यानात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ नियमित आणि निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसताना या प्रश्नाकडे कानाडोळा करत गेल्या आठवड्यात वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. जून महिन्यापासून उद्यानात वेळेवर उपचार न मिळाल्याने पहिल्यांदा वाघाटीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १० जून रोजी उद्यानात रेस्क्यू या संस्थेकडून उपचारानंतर ठणठणीत झालेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांना बिबट्या अनाथालयात कायमस्वरुपी आणले गेले.

ठोस निर्णय नाही

बिबट्याचे तिन्ही बछडे उद्यानात येताना पायावर चालत होते. जूनच्या अखेरीस तिघांनाही पायावर चालता येईना. १६ जुलै रोजी उद्यानात तिन्ही बछड्यांची कॅल्शियमची चाचणी केली गेली. त्यात तिघांच्याही शरीरात कॅल्शियमची पुरेशी मात्रा दिसून आली. बिबट्यांच्या ढासळत्या तब्येतीविषयी उद्यानाच्या पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे तसेच पशुवैद्यकीय अधिका-यांच्या समितीलाही ठोस निर्णय घेता येईना.

कॅल्शियम आणि जीवनसत्वाची कमतरता

८ ऑगस्ट रोजी उद्यानातील तिन्ही बछड्यांची खासगी पशुवैद्यकीय अधिका-यांनी रक्त तपासणी केली होती. तपासणीत कॅल्शियमसह, ड जीवनसत्त्वाचीही तिघांच्या शरीरात कमतरता असल्याचे दिसून आले. खासगी पशुवैद्यकीय अधिका-यांनी केलेल्या विशेष रक्ततपासणीत बछड्यांच्या शरीरात कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे अजब उत्तर संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी दिले.

संचालकांकडून टाळाटाळ

सुरुवातीला मुंबईतील खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि त्यानंतर जगण्याची आशा धुसर झालेल्या तिन्ही बछड्यांना तातडीने पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे सोपवले गेले. त्यावेळी बछड्यांना हाडांचा आजार असल्याचे निदान झाले. या सर्व वादात वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत उद्यान प्रशासनाकडून कारवाई झाली आहे, याचे उत्तर देण्यास संचालक सतत टाळाटाळ करत आहेत.

उद्यानात पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात वनमंत्री मग्न असताना गेल्याच आठवड्यात पुण्यात उपचार घेणा-या तिस-या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. सूत्रांच्या माहितीनुसार, हा बछडा आता पुन्हा चालू लागला आहे. बछड्यांच्या हाडांचा आजार असल्याने उशिरा निष्पन्न झालेले असतानाही गंभीर अवस्थेत पुण्यात दाखल झालेल्या तिस-या बछड्याला वाचवण्यात रेस्क्यू या संस्थेला यश आले आहे. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाची प्रतिमा मलीन झाल्याने पुणे वनविभाग तसेच उद्यान प्रशासनही बछड्यांची अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. हा बछडा बरा झाल्यानंतर पुन्हा उद्यानात आणला जाणार का, याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here