टाळी वाजवणारे हात आता वळणार स्वयंरोजगारांकडे! 

लॉकडाऊनमुळे तृतीय पंथीयांना घरात बसण्याची वेळ आल्याने टाळी वाजवत भिक मागणे बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

71

टाळी वाजवून पोट भरु शकत नाही, याचा अनुभव आता तृतीयपंथीयांना येवू लागला असून महिलांप्रमाणे स्वत:चा बचत गट तयार करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबईतील तृतीयपंथीयांचेही आता बचत गट महापालिकेच्यावतीने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तृतीयपंथीयांचे बचत गट बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुलुंड आणि भांडुपमधील तृतीयपंथीयांचे बचत गट

…ए दिदी…असे म्हणत पैसे मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांची टाळी वाजवणे बंद झाले. लॉकडाऊनमुळे घरात बसण्याची वेळ आल्याने टाळी वाजवत भिक मागणे बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता या तृतीयपंथीयांना स्वत:मधील कौशल्य दाखवून स्वयंरोजगार मिळवण्याची काळाची गरज असल्याची खात्री पटली. त्यामुळे आजवर महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने या तृतीयपंथीयांचे बचत गट स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. पण लॉकडाऊनमुळे होणारी उपासमार पाहता महिलांप्रमाणे बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनवण्याची तयारीही तृतीयपंथीयांनी दर्शवली आहे. त्यानुसार महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने मुलुंड आणि भांडुपमधील तृतीयपंथीयांचे बचत गट बनवण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा : मंडळे, महामंडळे बनले पांढरा हत्ती! २० वर्षांपूर्वीचे वार्षिक अहवाल २०२१मध्ये केले सादर!)

शिलाई मशिनसह इतर प्रकारच्या साहित्यांचे वाटप होणार !  

महिलांना ज्याप्रमाणे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून त्यांना शिलाई मशिनसह इतर प्रकारच्या साहित्यांचे वाटप केले जाते, त्याच धर्तीवर तृतीयपंथीयांना प्रशिक्षण देवून त्यांना साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्या पुढाकाराने एस विभागाच्या नियोजन विभागाच्या समाजविकास अधिकारी वेदीका पाटील यांच्या प्रयत्नाने पूर्व उपनगरातील विक्रोळी ते मुलुंड आदी भागांमध्ये तृतीयपंथीयांच्या भेटी घेवून तसेच त्यांची माहिती संकलित करून बचत गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या बचत गटासांठी देवामृत संस्थेच्या प्रिया जाधव यांचे सहकार्य महापालिकेच्यावतीने घेतले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.