तृतीय पंथीयांना महापालिकेच्या रुग्णालयातील दरवाजे कायम खुले!

158

तृतीय पंथीय समुदायाने आपल्या कुठल्याही आजाराबाबत तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाऊन न घाबरता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. संबंधित वैद्यकीय मंडळींवर विश्वास ठेवावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले.

असंसर्गजन्य आजाराबाबत तृतीय पंथीय समुदायासाठी जनजागृती शिबिर व कार्यशाळा विद्याविहार (पश्चिम) येथील जॉली जिमखानामध्ये बुधवारी संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी उपायुक्त (परिमंडळ ६) देवीदास क्षीरसागर, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) संजय सोनावणे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा हे मान्यवर उपस्थित होते.

आत्मनिर्भर योजना तयार

या प्रसंगी बोलतांना काकाणी यांनी, नवीन वैद्यकीय उपक्रम अंतर्गत आपण आमच्याकडे न येता, आम्ही आता आपल्यापर्यंत पोहोचत असून आपल्या गरजा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका योग्य त्या आत्मनिर्भर योजना तयार करीत असल्याचे काकाणी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. जेव्हा आपण एकत्रित येऊ, एकमेकांना सहकार्य करु, त्यावेळी सर्व योजनांचा लाभ मिळू शकेल आणि महानगरपालिका प्रशासनालाही उपक्रम योग्य पद्धतीने राबविता येईल, असेही त्यांनी अखेरीस नमूद केले.

(हेही वाचा आता बनावट हेल्मेट, प्रेशर कुकर विकणा-यांवर कारवाई, सरकारचा निर्णय)

आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारे अकारण त्रास न होता आपण आपल्या कामकाजाची निवड केली पाहिजे. आजाराविषयी मनामध्ये विविध कल्पना असतात. याबाबत आपण कोणता योग्य विचार करावा, कोणता करू नये, भ्रामक विचार कसे दूर करावेत, याविषयी मानसिक आरोग्याबाबत नुकतीच चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. कुठलाही आजार हा वाईट नसतो. त्या आजारावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, याविषयी विचार करून आपण त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत समतोल आहाराचे महत्त्व, मधुमेह, मानसिक आरोग्य, व्यसन मुक्ती तसेच एच.आय.व्ही. व तत्सम आजारांबद्दल विविध तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. नीलिमा कदम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, विनिता कदम, किन्नर माँ ट्रस्टच्या अध्यक्ष सलमा खान, प्रिया पाटील यांनी कार्यशाळा आयोजनासाठी सहकार्य केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.