सलग दुस-या दिवशी ‘आरे’तून बिबट्या जेरबंद, दोन दिवसांत तीन बिबटे पकडले नंतर…

आरेतील युनिट क्रमांक १५ मधून सलग दुस-या दिवशी बिबट्याला वनाधिका-यांनी जेरबंद केले. दिवाळीत दीड वर्षांच्या मुलीवर झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी आतापर्यंत पाच बिबट्यांना वनाधिका-यांनी पकडले होते. त्यापैकी बुधवारी सकाळी जेरबंद झालेली मादी बिबट्याने इतिका लोट या दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची खात्रीलायक बातमी आहे. सी५७ या अंदाजे साडेतीन वर्षांच्या मादी बिबट्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

महिलेवरही बिबट्याचा हल्ला 

आरेतील युनिट क्रमांक १५ येथे बिबट्याचा दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला झाला होता. त्यानंतर २६ आणि ३० ऑक्टोबर पाठोपाठ मंगळवारी दोन आणि बुधवारी पहाटे युनिट क्रमांक १५ मध्ये व नजीकच्या भागात  वनविभागाने पिंजरे लावले होते. त्यात पाच बिबटे अडकले. या दरम्यान युनिट क्रमांक १५ येथील तबेल्याबाहेर उभ्या असलेल्या माणसावर बिबट्याने नख मारुन पळ काढला होता. गेल्या आठवड्यात आदर्श नगर येथे महिलेवरही बिबट्याचा हल्ला झाला. या घटनाक्रमानंतर मंगळवारी पकडलेल्या दोन बिबट्यांपैकी मादी बिबट्याला वनाधिका-यांनी तातडीने रात्रीच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. दुसरी मादी बिबट्या अद्यापही वनाधिका-यांच्या पिंज-यातच आहे. बुधवारी सकाळी वनाधिकारी शोधत असलेली मादी बिबट्या पकडली गेल्याने आता ‘आरे’त माणसांवर हल्ले कमी होतील, अशी आशा वनाधिका-यांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here