मुंबईत अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. आरसीसी बॉक्स ड्रेन, मायक्रो टनेलिंग, फ्लड गेट, पाणी साठवण टाक्या, मिनी पंपिंग स्टेशन यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जलद उपसा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे, यंदा हिंदमाता, भरणी नाका (वडाळा अग्निशमन केंद्र) भायखळा, शीव (सायन) आणि माटुंगा स्थानक, महालक्ष्मी स्थानक, नायर रूग्णालय या अतिशय सखल परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मुंबई शहर विभागात मोठी व आव्हानात्मक विविध कामे हाती घेतली. ती आता पूर्ण होत आहेत. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन जीवनमानामध्ये अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरुपात दिसून येईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले.
महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात मिनी पंपिंग स्टेशन
नायर रुग्णालय तसेच, मोरलँड मार्ग, एम. ए मार्ग, मराठा मंदिर जंक्शन, जेकब सर्कल (सात-रस्ता) या ई आणि जी/ दक्षिण विभागातील सखल परिसरात जास्त पाऊस झाल्यानंतर वारंवार पाणी साचते. याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने १२०० मिमी व्यासाच्या दोन वाहिन्या टाकल्या आहेत. महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्टपासून डॉ. ई. मोजेस मार्गावरील फेमस स्टुडिओ बस थांब्यापर्यंत जी दक्षिण विभागाच्या हद्दीतील कामात डबल बॅरल बॉक्स ड्रेनमधून या वाहिन्या टाकल्या आहेत. तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेच्या आवारात मिनी पंपिंग स्टेशन उभारले आहे. ताशी ३ हजार घनमीटर क्षमतेचे सबमर्सिबल पंप याठिकाणी बसवले आहेत. हे मिनी पंपिंग स्टेशन २०२२ च्या पावसाळ्यापासून कार्यान्वित केले आहे. या अंमलबजावणीमुळे गत पावसाळ्यात देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता त्याच्या विस्तारामुळे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्यान पाणी साचण्यापासून निश्चित मोठा दिलासा मिळेल.
(हेही वाचा – Mhada : म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संजीव जयस्वाल, डिग्गीकर यांची बदली)
नायर रुग्णालयाजवळी डॉ. आनंदराव नायर मार्गावर बॉक्स ड्रेन
ई विभागात आनंदराव नायर मार्ग (नायर हॉस्पिटल) ते घास गल्ली या सखल परिसरात जोरदार पावसावेळी पाणी साचते. याठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने बॉक्स ड्रोन बांधण्याचा निर्णय पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून घेण्यात आला. आतापर्यंत ४५ टक्के काम या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काही अंशी दिलासा मिळेल.
भायखळा एस पाटणवाला मार्गावर बॉक्स ड्रेन
भायखळा स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते दत्ताराम लाड मार्ग या भागात पावसाचे पाणी साचले तर रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. हे लक्षात घेता, पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अंतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन तयार करण्यात आला. या बॉक्स ड्रेनचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या परिसरात देखील नागरिकांना हमखास दिलासा मिळेल.
वडाळा अग्निशमन केंद्र येथे मिनी पंपिंग स्टेशन
एफ दक्षिण विभागात वडाळा अग्निशमन केंद्र येथील भरणी नाका परिसरात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची वाहिनी अंथरली आहे. त्यासोबतच वडाळा अग्निशमन केंद्र परिसरात मिनी पंपिंग स्टेशन उभारले आहे. येथे ३ हजार घनमीटर क्षमतेच्या दोन पंपाच्या मदतीने पावसाचे पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे भरणी नाका आणि वडाळा येथे पावसाचे पाणी साचण्याच्या गैरसोयीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शीव आणि माटुंगा स्थानक परिसराला मिळणार दिलासा
मुख्याध्यापक भवन (शीव) तसेच, शीव आणि माटुंगा स्थानक परिसरात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने निरनिराळी कामे हाती घेतली होती. त्यामध्ये आरसीसी बॉक्स ड्रेन, आरसीसी वाहिन्या अंथरणे, मिनी पंपिंग स्टेशन उभारणी, धारावी ९० फूट रस्त्याखाली मायक्रो टनेलिंगच्या माध्यमातून १८०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी अंथरणे यासारखी कामे हाती घेतली होती. आगामी पावसाळ्यापूर्वी याठिकाणी तात्पुरत्या फ्लड गेटची यंत्रणाही भरतीच्या कालावधीसाठी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शीव (सायन) आणि माटुंगा स्थानकात पाणी साचून उपनगरीय लोकल सेवा खोळंबा होण्यापासून सुटका होणार आहे.
हिंदमाता परिसरासाठी ६.४८ कोटी लीटर क्षमतेच्या भूमिगत पाणी साठवण टाक्या
हिंदमाता परिसर हा मुंबईतील अतिशय सखल भागांपैकी आहे. हिंदमाता परिसरात जोरदार पावसामुळे साचलेले पाणी उपसून ते साठवण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान आणि सेंट झेवियर्स मैदान येथे भूमिगत साठवण टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही साठवण टाक्यांची क्षमता ही ६.४८ कोटी लीटर इतकी आहे. त्यामुळे भरतीच्या काळात जोरदार पावसामुळे साचणारे पाणी साठवण्याची सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे. परिणामी, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम हॉस्पिटल), टाटा कर्करोग रुग्णालय, वाडिया रुग्णालय या महत्वाच्या परिसरात वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहिल्यामुळे एकूणच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community