नायगाव, परेल व्हिलेज, काळेवाडी परिसराच्या पाण्याच्या सुधारणेत ही मात्रा पडली लागू

107

नायगाव, परेल व्हिलेज, काळेवाडी या दक्षिण मुंबईतील काही भागांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गोलंजी टेकडी जलाशयाला लागलेली गळती दुरुस्ती करण्यात आली. मागील सहा महिन्यांपूर्वी केलेल्या या कामामुळे गोलंजी जलाशयास होणा-या पाणीपुरवठयात जवळजवळ १० टक्के इतकी वाढ झाली.

म्हणून पूर्वीपेक्षा २० ते ५० मिनिटे आधी जलाशयाची पूर्ण पातळी गाठली जाऊ लागली आहे. त्यामुळे या भागातील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या दूर झाली असून, हे काम नियोजित वेळेपूर्वी करणाऱ्या अभियंते, अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन प्रशासनाच्यावतीने गौरविण्यात आले आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या, फडणवीसांना असे का वाटते?)

विशेष उपायांची होती गरज

गोलंजी टेकडी जलाशयाच्या उत्तर दिशेस असणा-या शिवडीतील आचार्य दोंदे मार्गावर मागील १९८८ पासून पाणी गळती होत होती, परंतु ही गळती शोधून सापडत नव्हती. ही गळती क्लोरीन हाऊसच्या खालून जाणा-या इनलेटवर असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. त्यामुळे ही गळती थांबविण्यासाठी प्रचलित उपायांपेक्षा काही विशेष उपाय करणे गरजेचे होते. यासाठी जलाशयाला पाणीपुरवठा करणारी जुनी जीर्ण झालेली ६०० मीमी. व्यासाची जलवाहिनी बंद करुन त्याऐवजी सलग एकच ७५० मीमी. व्यासाची जलवाहिनी जलाशयापर्यंत टाकणे गरजेचे होते. तसेच जुन्या जलप्रणालीचे आऊटलेट्स, ज्यामधून पाणी तेथेच फिरत होते, ते पूर्णपणे बंद करून बस बार पासून सरळ रेषेत नवीन जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम हाती घेण्यात आले.

२१ तासांमध्ये काम पूर्ण

त्यामुळे हे काम ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हाती घेण्यात आले होते. हे काम २४ तासांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु महापालिकेच्या जलकामे शहर एकच्यावतीने परिरक्षण विभागाने हे काम २१ तासांमध्येच पूर्ण केले. या कामामुळे गोलंजी जलाशयास होणा-या पाणीपुरवठयात जवळजवळ १० टक्के इतकी वाढ झाली. त्यामुळे पूर्वीपेक्षा २० ते ५० मिनिटे आधी जलाशयाची पूर्ण पातळी गाठली जाऊ लागली असल्याची माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

(हेही वाचाः माफीनाम्यावर शिवसैनिक कायम, पोलिस ठाण्यावरही केली गर्दी)

अधिक दाबाने पाणीपुरवठा

या जलअभियंता विभागाच्या परिरक्षण विभागाने हे आव्हानात्मक काम केले. केवळ दुरुस्ती न करता पूर्ण जलवाहिनी बदलल्याने या भागातील पाण्याच्या पुरवठ्यात मोठा बदल झाला आणि आजवर गळतीमुळे वरच्या भागाला पाण्याचा पुरवठा जो कमी दाबाने होत होता, तो आता अधिक दाबाने होत आहे, तसेच गोलंजी जलाशयही पूर्ण क्षमतेने भरत आहे. या कामात झोकून देऊन चिकाटीने व अथक प्रयत्न करून काम केल्याबद्दल सहायक अभियंता (परिरक्षण) शैलेंद्र सोनटक्के यांच्यासह ११ नियोजन, बांधकाम आणि परिरक्षण विभागाच्या ११ अभियंत्यांना उपायुक्त अजय राठोर यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.