सध्या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर चांगलेच त्रस्त झाले असतानाच आता मुंबईकरांना वरुणराजाच्या आगमनाची पहिलीवहिली चाहूल मिळाली आहे. उन्हांच्या तप्त किरणात पानझड सुरु असताना आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. मुंबईभर पिवळ्याधमक फुलांची आरास गुंफणारा बहावा फुलला आहे. बहावा फुलल्यानंतर साधारणतः दीड महिन्यांची प्रतीक्षा आणि मग पावसाच्या अलगद सरी उष्णतेच्या झळांपासून मुंबईकरांना मुक्त करतील, हे संकेत निसर्गाने आता दिले आहेत.
( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )
पावसाच्या आगमानाचे प्राथमिक संकेत
मे महिना दाराशी उभा ठाकलेला असताना गेल्या दोन महिन्यांनी गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना अजून एक महिना कसा सरेल, ही कल्पनाही असह्य झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व सरींना सुरुवात होते. या सरी कधीपासून बरसायला सुरुवात होतील, असा भलामोठा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. बहावा हे पावसाच्या आगमानाचे प्राथमिक संकेत मानले जाते. यादरम्यान आता कोकिळेचे गाणे, कावळ्याचे घरटे बांधण्याची सुरुवात या निसर्गातील मनमोहक हालचाली पावसाळा वेशीवर आल्याचे संकेत देतात. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीला चातकही सहज दिसू लागतो.
पावसाचे स्वागत करण्यासाठी सज्ज
सध्या सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरु लागले आहेत. मुंबईभर रस्त्याच्या कडेला फुललेला बहावा मात्र मुंबईकरांना, वृक्षप्रेमींना आकर्षित करत आहे. रस्त्याला लागून फुललेली पिवळ्याधमक फुलांची आरास ही जणू काही पावसाचे स्वागतच करण्यासाठी सज्ज झाली आहे. असे मनमोहक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईत बहाव्याचे जवळपास ४ हजार ८५६ वृक्ष आहेत.
Join Our WhatsApp Community