यंदा ५वी पास मुन्नाभाई १०वी पास होणार! 

यंदाच्या वर्षी खासगी विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल ५वी, ६ वी, ७ वी अथवा ८वी ज्या कोणत्या वर्षी पास होऊन शाळा सोडली असेल, त्या वर्षाच्या निकालावरून १०वीसाठी गुण दिले जाणार आहेत. तसा शासननिर्णय घेण्यात आला आहे. 

यंदाच्या वर्षी १०वी परीक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाने १०वीच्या निकालाचा अवघा गोंधळ उडणार आहे. यंदाच्या वर्षी १७ नंबरचा फॉर्म भरून बाहेरून १०वीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांचाही निकाल लावण्याचे धाडस राज्य सरकार करणार आहे. त्यांच्या निकालाचा फॉर्म्युला ऐकून कुणीही डोक्यावर हात मारल्याशिवाय राहणार नाही.

५वी, ६वी किंवा ७वीच्या निकालाचे ८० टक्के गुण ग्राह्य धरणार!

सरकारच्या शासननिर्णयानुसार जे विद्यार्थी १७ नंबरचा फॉर्म भरून १०च्या परीक्षेला बसले असतील, त्यांना त्यांनी ज्या इयत्तेपासून शाळा सोडली, त्या इयत्तेच्या मागील इयत्तेच्या निकालाची टक्केवारी गृहीत धरून ८० टक्के गुण दिले जाणार आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने ६वी इयत्तेपासून शाळा सोडली असेल आणि तो यंदाच्या वर्षी १७ नंबरचा फॉर्म भरून १०वीच्या परीक्षेला बसला असेल, तर त्याला ५वीच्या इयत्तेचा निकाल सादर करावा लागेल. त्या वर्षाच्या निकालाचे मूल्यमापन करून ८० टक्के गुण दिले जातील, त्यानंतर उर्वरित २० टक्के गुण तोंडी परीक्षा घेऊन दिले जाणार आहेत. याचा अर्थ असा होतो कि, यंदाच्या वर्षी खासगी विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल ५वी, ६ वी, ७ वी अथवा ८वी ज्या कोणत्या वर्षी पास होऊन शाळा सोडली असेल, त्या वर्षाच्या निकालावरून १०वीसाठी गुण दिले जाणार आहेत. तसा शासननिर्णय घेण्यात आला आहे.

तोंडी परीक्षा मोबाईलवर होणार! 

खासगी विद्यार्थ्यांसह नियमित विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे २० गुण दिले जाणार आहेत. ही परीक्षाही मोबाईलवरून घेतली जाणार आहे. त्यामुळे त्यात विद्यार्थ्याने कुणाचीही मदत घेतलेली नाही, परीक्षेसाठीच्या सर्व नियमांचे पालन करूनच उत्तरे दिली आहेत, असे गृहीत धरूनच गुण दिले जाणार आहेत.

गृहपाठ, स्वाध्यायाकडे विद्यार्थ्यांची पाठ! 

सर्व शाळांना कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत बोर्डाकडे निकाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी नियमित विद्यार्थ्यांना गृहपाठ, स्वाध्याय सादर करण्यासाठी २० जून अंतिम मुदत दिली आहे. अजूनही बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हा निरोप पोहचला नाही. मुंबई शहरातच २०-२५ टक्के विद्यार्थ्यांनीच गृहपाठ सादर केले आहेत, तिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचारच न केलेला बरा, त्यामुळे विद्यार्थ्यांना ३० गुण कसे द्यायचे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here