लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू असलेल्या वारीला सुद्धा बसला होता. वारीवर या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण आता सर्व वारक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे. सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व वारक-यांना यंदा पायी दिंडी करत आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे.
पालकमंत्र्यांची घोषणा
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वारीवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. दरवर्षी 12 लाख वारकरी हे पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. पण यावर्षी किमान 15 लाख वारकरी पायी जाण्याची शक्यता असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः दहावेळा चकवा देणारा बिबट्या अखेर जेरबंद!)
महाराष्ट्रासाठी आनंद सोहळा
राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या सर्व वारक-यांचे जिल्ह्यातील सर्वांनी स्वागत करायला हवे. हा केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रसाठी आनंद सोहळा असल्याचेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community