यंदाच्या कोविड निर्बंधमुक्त गणेशोत्सवात यंदा बाप्पांना दीड दिवसांमध्ये निरोप न देता पाच ते सहा दिवसांपर्यंत मुक्काम वाढवण्यात आला होता. पाच दिवसांच्या श्री गणरायांसह सहाव्या दिवशी गौरी गणपतीच्या बाप्पांनाही सोमवारी भक्तांनी निरोप दिला. मात्र, पाचव्या आणि सहाव्या दिवसांमधील मूर्ती विसर्जनाची आकडेवारी ही मागील चार वर्षांपेक्षा सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही दिवशी मिळून एकूण ७९ हजार ४०४ मूर्तींसह गौरींचे विसर्जन झाले आहे. कोविड पूर्वी म्हणजे २०१९मध्ये या दोन्ही दिवशी ७६ हजार ८१९ मूर्तींचे विसर्जन झाले होते. कोविड काळातील दोन वर्षांच्या तुलनेतही पाचव्या आणि गौरी गणपतीच्या बाप्पांच्या मूर्ती विसर्जनात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येते.
( हेही वाचा : अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन : अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी विसर्जन स्थळांची केली पाहणी )
कोविड काळात म्हणजे सन २०२०मध्ये एकूण १ लाख ३५ हजार ५१५ गणेश मूर्तींपैंकी पाचव्या आणि सहाव्या दिवशी ५७ हजार १७५ मूर्तींचे विसर्जन झाले होते. तर सन २०२१मध्ये एकूण १ लाख ६४ हजार७६१ गणेश मूर्तींपैकी ६६,३३३ मूर्तींचे विसर्जन झाले होते. या दोन्ही वर्षी अनुक्रमे दीड दिवसांच्या एकूण ४० हजार ८९५ व एकूण ४८ हजार ७१६ मूर्तींचे विसर्जन झाले होते.
विशेष म्हणजे कोविडमध्ये कृत्रिम तलावांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभ होता. कोविडपूर्वी म्हणजे सन २०१९मध्ये पाचव्या व सहाव्या दिवसांमध्ये केवळ १३ हजार २६८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. पण कोविडमध्ये कृत्रिम तलावासह फिरते कृत्रिम तलावांची व्यवस्था अधिक उपलब्ध करून देण्यात आल्याने सन २०२० व सन २०२१ मध्ये या दोन्ही दिवशी अनुक्रमे २९ हजार आणि ३४ हजार एवढ्याच गणेश मूर्तींसह गौरींचे विसर्जन झाले होते. तर यंदा या दोन्ही दिवशी ३० हजार ४० गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन पार पडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भक्तांकडून कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवली जात असल्याचे पहायला मिळत आहे.
गणशोत्सवातील पाचव्या व सहाव्या दिवसांमधील चार वर्षांची आकडेवारी:
यंदा पाचव्या व सहाव्या दिवशीचे एकूण गणेश विसर्जन : ७९,४०४
- सन २०२१ मधील गणेश मूर्ती विसर्जन : ६६,३३३
- सन २०२०मधील पाचव्या व सहाव्या दिवशीचे विसर्जन : ५७,१७५
- सन २०१९मधील पाचव्या व सहाव्या दिवशीचे विसर्जन : ७६, ८९१
यंदा कृत्रिम तलावांमधील पाचव्या व सहाव्या दिवशीचे एकूण गणेश विसर्जन : ३०,०४०
- सन २०२१मधील गणेश मूर्तींचे विसर्जन : ३४,२९९
- सन २०२०मधील पाचव्या व सहाव्या दिवशीचे विसर्जन : २९,९९९
- सन २०१९मधील पाचव्या व सहाव्या दिवशीचे विसर्जन : १३,२६८